लातूर: सहकारी साखर कारखान्याची निवडणुक म्हणजे वधू-वर परिचय मेळावा समजून गाव, शेती, ऊस, याचा कसलाही संबंध नसलेली मंडळी औसा तालुक्यात आपली ओळख निर्माण करण्यासाठी मारुती महाराज साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरली आहेत. त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करा, विश्वासाची परंपरा घेवून केवळ तुमच्या भविष्यासाठी निवडणुक लढवणाऱ्या विकासरत्न देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले.
श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ औसा येथे आयोजित सभेत पॅनल प्रमुख आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी पॅनलचे समन्वयक एस. आर. देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, काँग्रसचे ज्येष्ट पदाधिकारी ॲड. विक्रम हिप्परकर, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, कल्याण पाटील, उदयसिंह देशमुख, नारायण लोखंडे सर्जेराव मोरे, योगीराज पाटील, सभापती औसा बाजार समिती, सुरेश दाजी पवार, –तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संजय उजळंबे, संजय कदम, चंद्रचुड चव्हाण, पृथ्वीराज सिरसारट, सदाशिव कदम, विजय देशमुख, मनोज पाटील, संभाजी रेड्डी, सचिन दाताळ, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, रामदास चव्हाण, अरुण कुलकर्णी, ज्येष्ठ सभासद रमाकांत साळुंके, तुकाराम ढोक, नामदेव यादव, मुसदीक सिध्दीकी, दिलीप गायकवाड, उमेश पाठक, युवराज ढोक, नागनाथ साळुंके, सौ स्वंयप्रभाताई पाटील, माजी नगरसेविका जयश्री उटगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, आदरणीय विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखानदारी उभी केली, ती यशस्वीपणे चालवली त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणली. तो वारसा तो वसा आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आजही चालविला जात आहे. ही परंपरा मारुती महाराज कारखान्यातही चालविली जावी म्हणून शेतकऱ्यांनी आग्रह केला, तो आग्रह मोडला नाही आणि मी या निवडणुकीत पॅनल उभा केला. आमच्याकडे हे सर्व काही सांगण्यासारखे आहे. त्यावर विश्वास ठेवून शेतकरी सभासद या पॅनलला मतदान करणार याची मला खात्री आहे.
Comments