लातूर: सत्तेचे केंद्रीकरण करुन लोकशाही धोक्यात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहेत. तो डाव उधळून लावणे आवश्यक आहे. त्यासाठीच जनतेतील असंतोष संघटीत करण्याचे काम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष करीत असल्याचे काँग्रस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेला जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात लातूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित भव्य-दिव्य जाहिर सभेत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आमदार बस्वराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री नसिम खान, आमदार त्र्यंबक भिसे, अर्चनाताई पाटील चाकूरकर, अमर राजूरकर, महराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, जि.प.सदस्य धिरज देशमुख, सचिव अदित्य पाटील, लातूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.व्यंकट बेद्रे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता आरळीकर, महिला शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.स्मिता खानापूरे, जितेंद देहाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
- माणूस ही एकच जात त्या माणसासाठी काँग्रेसने काम केले
शिवराज पाटील चाकूरकर
माणसाने अनेक जाती निर्माण केल्या या सर्व माणसाने निर्माण केलेल्या जाती खोटया आहेत. माणूस ही एकच जात खरी आहे त्या माणसासाठी काँग्रेसने पक्षाने काम केले आहे, असे माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील यांनी बोलतांना सांगीतले. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मी आजपर्यंत अनेक सभांना उपस्थित राहिलो. पण आजची सभा ही सर्वांत वेगळी सभा वाटते. या सभेचे नियोजन माजी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उत्तम झाले असून आपल्या सर्वांच्या उपस्थितीने एकप्रकारे ही आगामी काळातील विजयाची सभा वाटते. काँग्रेस पक्षाने देशाला स्वतंत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर राजेराजवाडे विविध विभागात विभागलेला देश एकत्र करुन देशाला लोकशाही बहाल केली, संविधान लागू केले. या संविधानाने आपल्या सर्वांना समान संधी मिळाली. आज आपण पहातोय जगात अनेक ठिकाणी सैनिकी शासन आले पण भारतात मात्र देशाच स्वतंत्र अबाधीत आहे.
मोदींचे कृषी धोरण चुकीचे
- पृथ्वीराज चव्हाण
राज्यातीलच नाही तर देशातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमाल आयात केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही आणि तो मिळावा यासाठीची सरकारकडे यंत्रणाच उपलब्घ नाही. या कारणाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेद्र मोदी सरकारची आखलेली धोरणे ही चुकीची आहेत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पूढे बोलतांना ते म्हणाले, राज्यातील आणि देशातील भाजपाचे सरकार केवळ घोषणाच करते त्यांची अमंलबजावणी करीत नाही. सरकारने हमीभाव जाहीर केले, कर्जमाफीची घोषणा केली, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे घोषणा केली पण या सर्व पोकळ घोषणा ठरल्या आहेत. या घोषणा पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी याची शेती आणि शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे ते मुठभर शहरी लोकांचा विचार करीत आहेत. सरकार कडून ३ टक्के हमीभाव वाढवले असे सांगीतले जाते पण काँग्रेस सरकारने १९ टक्के हमीभाव वाढले होते याचा विचार करणे गरजेचे आहे.
राज्यात विलासराव देशमुख यांचे आणि देश पातळीवर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाच्या रूपाने शेतकऱ्यांचे राज्य होते आणि लातूरचा तो सुवर्णकाळ होता. ते शेतकऱ्यांचे राज्य राज्यात आणि लातूरचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी सत्ता परिवर्तन करू असे उपस्थितांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आवाहन केले.
विलासरावजी देशमुख यांचे नेतत्व आणि त्यांनी विकासाचे केलेल्या कामाची आजही महाराष्ट्र पावलोपावली आठवण काढतो आहे. त्यांची उणीव आज आम्हाला सर्वांना जाणवते आहे. आपण सर्वांनी विलासरावजींच्या रुपाने कर्तृत्ववान, कर्तबगार, कर्ता नेतृत्वाचा अनुभव घेतला आहे. विलासरावजींचा शेतकरी हा आपूलकीचा विषय होता. जिथे शेतकरी अडचणीत तेथे विलासरावजींनी त्यांना भरघोस मदत केली.
अमित देशमुखां रुपाने लातूरचे भविष्य उज्वल
- हर्षवर्धन पाटील
विलासरावजी देशमुख यांच्या जाण्याने लातूरच, राज्याच आणि देशाच नुकसान झाल आहे. त्यांच्या जाण्याचे फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विलासरावजींच्या सर्वांनी दमदार आणि धिराने वाटचाल केली. या वाटचालीला आपण सर्व लातूरकरांनी साथ दिली हे कौतूकास्पद आहे. येणाऱ्या काळात अमित देशमुख यांच्या रूपाने लातूरच भविष्य उज्वल आहे, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगतले.
पूढे बोलतांना ते म्हणाले, विलासरावजी देशमुख यांनी माणसे घडविण्याचे काम केले असे सांगून सामान्य माणसांना त्यांनी कशी मदत केली यांचे किस्से सांगून सत्ता मिळविण्यासाठी नाही तर लोकांना न्याय देण्यासाठी, मदत करण्यासाठी जनसंघर्ष यात्रा आहे. दुष्काळातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी, समाजातील तणाव कमी करण्यासाठी आम्ही जनसंघर्ष यात्रा काढली आहे. मराठा समाज, लिंगायत, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या नावावर हे सरकार फसवित आहे. आरक्षणाच्या नावावर समाजात तणाव पसरवित आहे या सरकाला बदलण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
सरकारला सांगू दिल्ली छोडो, मुंबई छोडो
-दिलीपरावजी देशमुख
राज्यात आणि देशात सरकार आल्यावर सरकारची धोरणे बदलावी म्हणून आपण सुरुवातील विरोध केला, मोर्चे काढले, निषेध केला पण सरकारची धोरणे बदलली नाहीत. यामुळे आता सरकार सुधारेल असे वाटत नाही. म्हणून सरकारलाच सांगावे लागेल दिल्ली छोडो, मुंबई छोडो अशी टिका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली.
या सरकारच्या काळात फार मोठी अराजकता देशात निर्माण झाली आहे. लोकशाहीत ही आराजकता निर्माण होणे हे दुर्देवी आहे. यामूळे भाजपाच्या काळात सज्जन माणूस घाबरतो आहे आणि चोर मात्र पळून जात आहेत. त्यांच्या या धोरणामूळे व्यापारी, उदयोजक, व्यवसायीक भयभीत झाले आहेत. सरकारला विरोध करून सरकार बदलत नाही म्हणून आता सरकार मध्येच परिवर्तन करावे लागेल याकरीता महात्मा गांधींनी इंग्रजांना सांगीतले की भारत छोडो, आता आपल्याला जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने सरकारला सांगायचे आहे सरकार छोडो असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर
-अमित विलासराव देशमुख
या सरकारने अच्छेदिनचे खोटे स्वप्न दाखविले आहे. पण आम्हाला अच्छेदिन शोधूनही सापडत नाहीत. सामान्य माणूस अडचणीत आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभेवर तिरंगा फडकवला पाहिजे तर सामान्य माणसांना न्याय मिळेल. या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठीच काँग्रस जनसंघर्षाच्या रुपाने रस्त्यावर आले आहे असे माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगीतले.
पूढे बोलतांना ते म्हणाले,. मराठवाडयात शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, दिलीपरावजी यांनी मराठवाडयाचे मागासलेपण दूर केले. आज आपण दिल्लीपासून गल्लीपर्यंत विरोधी पक्षात आहोतयांची जाणीव आहे. पण हे सरकारही कोणतेच काम करीत नाही.
लातूर जिल्ह्यात सरकारची १५ टक्क्याचे सरकार अशी ओळख झाली आहे. एखादे काम भाजपाकडे घेवून गेलो तर ते आधी काम सोडा, किती दाम देता? असे विचारतात. लातूरात कायदा, सुव्यवस्था ढासाळली, खून, चोऱ्या दरोडा वाढलेत याचे उत्तर भाजपाने द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
पूढे बोलतांना ते म्हणाले लातूरला चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला पून्हा यशवंतरावजींचे, शंकररावजींचे, पृथ्वीराजजींचे, अशोकजरावजींचे सरकार आणावे लागेल. या निमित्ताने आपण आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लातूरचा गड शाबूत ठेवण्याची ग्वाही देवू या. आपली सर्वांची उपसिथती जनसंघर्ष यात्रेला सामान्य माणसाची साथ आणि समर्थन आहे हेच दर्शवत असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगीतले.
भाजपाचा विकास कागदावरच
- धिरज देशमुख
लोकांची सेवा कशी करावी, विकास कसा करावा हे काँग्रेकडून शिकावे. भाजपाचा विकास प्रत्यक्षात दिसत नाही तो कागदावरच आहे असे प्रतिपादन युवा नेते धिरज देशमुख यांनी केले आहे. बोलतांना ते म्हणाले, भाजपा सरकारने केवळ निवडणुकीत आश्वासने दिली. त्यांची पूर्तता केली नाही. आता त्यांना आश्वासनाचे काय झाले हे विचारावे लागेल.
यावेळी माजी मंत्री नसीम खान, आमदार त्रयबंक भिसे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची भाषणे झाली.
या सभेस जिल्हाभ्रातून मोठया संख्येने लोक उपस्थित होते. लातूर शहरातून मिरवणूकीने लोक सभेस येत होते. त्यामूळे शहराचे वातावरण काँग्रेसमय झाले होते. या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने मोटर सायकल रॅली काढण्यात आली. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, अल्पसंख्यांक सेल, मागासवर्गिय सेल, सेवादल, एनएसयूआय, विलासराव देशमुख युवा मंच, लातूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचलन सुधन्वा पत्की यांनी केले.
Comments