HOME   टॉप स्टोरी

लोकसभा इच्छूक उमेदवारांची ०७ डिसेंबरला छानणी

लातुरातून ५२ जणांची कॉंग्रेसकडून लढण्याची इच्छा- आ. अमित देशमुख


लोकसभा इच्छूक उमेदवारांची ०७ डिसेंबरला छानणी

लातूर: आगामी लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविलेल्या ५२ उमेदवारांची छाननी करून प्रस्तावित यादी तयार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून प्रदेश छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. या छाननी समितीची बैठक लातूर येथे येत्या ०७ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली.
मागच्या साडेचार वर्षापासून राज्य व केंद्रातील सरकारच्या तुघलकी कारभाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचा जिल्हा आणि काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यात आली आहे. आता येथे काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी राहीली आहे. त्यामुळेच लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षामार्फत निवडणूक लढविणाऱ्या इच्छूकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल ५२ उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील टिळक भवन येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत या सर्व उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली होती. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या प्रतिसादामुळे जेष्ठ नेतेही अचंबित झाले होते. या उमेदवारांमधून छानणी करण्याचा व अंतिम उमेदवारांची यादी तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानूसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार लातूर लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांशी चर्चा करून आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी आमदार तथा इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, माजी आमदार भाऊराव पाटील-गोरेगावकर, माजी खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, आणि युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस तथा प्रवक्ते चेतन चव्हाण यांचा या समितीत समावेश असून ते इच्छूक उमेदवार व पक्षपदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून प्रस्तावित यादी तयार करतील असे आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस भवन येथे बैठक
०७ डीसेंबर रोजी प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेली छाननी समिती लातूर येथे येणार आहे. काँग्रेस भवन येथे दिवसभर छानणी समितीचे सदस्य इच्छूक उमेदवार आणि जिल्ह्यातील नेते पदाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करतील असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.व्यंकट बेद्रे व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी म्हटले आहे. इच्छूक उमेदवारांसोबत आजी– माजी आमदार व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मत आजमावल्यानंतर ही समिती प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


Comments

Top