लातूर: ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे काढले जातील. प्रसंगी न्यायालयातही जाऊ असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात ३० संघटना या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. अष्टविनायक हॉलमध्ये अयोजित या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या.
मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र १६ टक्के आरक्षण घोषित केल्यानं ओबीसी समाज धास्तावला आहे. सरकारने ओबीसी प्रवर्गाच्या समकक्ष प्रवर्ग तयार करुन मराठा आरक्षण घोषित केल्याने अनेक अभ्यासकांनाही ‘दाल मे कुछ काला नजर आ रहा है’. अनेक अभ्यासकांना हे आरक्षण ओबीसींच्या मुळावर अशी शंका वाटत आहे. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणावर नक्क्कीच अतिक्रमण होणार आहे. ते आम्ही कदापी सहन करणार नाही. या संदर्भात आम्ही प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्यांनीही काही गोष्टी सांगितल्या. त्यांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे असे मुस्लीम आरक्षण ऑर्गनायजेशनचे जिल्हाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी सांगितले. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जिल्हाभर मोर्चे आणि आंदोलनांचे आयोजन केले जात आहे अशी माहिती गोपाळ बुरबुरे यांनी दिली. ओबीसीच्या या आंदोलनाला आधी काही संघटनांनी पाठिंबा दिला होता. आता महाराष्ट्रभरातून ३० ते ३५ संघटना पुढे आल्या आहेत. सरकारला आधी तोंडी सांगू, मग लेखी देऊ त्याचाही उपयोग न झाल्यास महाराष्ट्रव्यापी आंदोलन उभे करु असा इशारा यशपाल भंडे यांनी दिला. या आधीच्या बैठकीपेक्षा या बैठकीला खूप मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
Comments