लातूर: लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ, अनुभवी कॉंग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे. या मागणीसाठी आपण पक्षाध्यक्ष राहूल गांधी, मल्लीकार्जून खरगे आणि प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना भेटून मागणीचं निवेदन दिलं आहे अशी माहिती अशोकराव पाटील निलंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या निवडणुकीच्या मोसमात राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीबद्दल कॉंग्रेस नेत्यांनी पहिल्यांदा जाहीर वाच्यता केली आहे.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी अनेकदा खासदार म्हणून काम पाहिले. ते देशाचे माजी गृहमंत्री, सभापती आणि माजी राज्यपालही होते. ते सांसदीय कामकाज चांगल्या पद्धतीने जाणतात. उमरगा, औसा आणि निलंग्याच्या ६५ गावांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोन आमदार आहेत. बहुतांश संस्था कॉंग्रेसकडे आहेत. त्यामुळे त्यांची निवड योग्य राहील असा दावा अशोकरावांनी केला.
मीच मोठा भैय्या!
लातूर जिल्ह्यात सध्या तीन नेत्यांना भैय्या म्हटले जाते. पहिल्यांदा मला म्हणायचे, नंतर आ. अमित देशमुख यांना म्हणू लागले आणि तिसरे पालकमंत्री आमच्या पक्षाचे नसल्याने त्यांचा संबंध नाही. मी वयाने आणि अनुभवाने मोठा असल्याने आपसुकच मी मोठा भैय्या आहे असे सांकेतिकरित्या अशोकराव म्हणाले. आम्ही, देशमुख आणि चाकूरकर एकच आहोत. प्रत्येक निवडणुकीत आम्ही मिळून काम केले आहे असेही ते म्हणाले. राज्य आणि केंद्रातील सरकारने जनता, शेतकरी आणि तरुणांची मोठी फसगत केली आहे. आता येणारे दिवस कॉंग्रेसचे असतील असा दावा त्यांनी केला.
Comments