लातूर: इंधनाचं काय? हा भारतच काय सबंध जगासमोर पडलेला प्रश्न. जगभरात इंधन वाचवण्याचे असंख्य प्रयोग आहेत. पर्यायी इंधनाचाही शोध घेतला जात आहे. अशातच हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन या इंधन कंपनीनंच पुढाकार घेऊन महाराष्ट्रात २०० ठिकाणी इंधन वाचवण्याचा संदेश देणार्या सायकल रॅलीज काढल्या. अशीच एक सायकल रॅली लातुरातही काढण्यात आली. प्रमोद गॅसच्या सहकार्याने निघालेल्या या रॅलीत शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि नागरिकही सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिकारी काकासाहेब डोळे आणि एचपीसीएल कंपनीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी इंधन वाचवण्याची शपथ घेण्यात आली. नगरसेविका सौ. वर्षा शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते रॅलीला झंडी दाखवण्यात आली. या रॅलीने राजीव गांधी चौकापासून पुन्हा क्रीडा संकुल गाठले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि खाऊचा बॉक्सही देण्यात आला.
Comments