लातूर: महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे मार्केटयार्डामध्ये लातुरात आले होते. लातुरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भाजपामध्ये येण्याचा विचार करु नये कारण सुजय विखे पाटील हे कर्तृवान आहेत पण अमित देशमुख हे कर्तृत्वशून्य आहेत यामुळे भाजपात त्यांना जागा नाही असा टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे. लातुरला मुख्यमंत्रीपद होते केंद्रीय गृहमंत्री पद होते मग लातुरच्या विकासात माशी कुठे शिंकली असा सवाल तावडेंनी उपस्थित केला. लातुरच्या मार्केट यार्डात आतापर्यंत फक्त कॉंग्रेसच्या नेत्यांची मर्जी राखणार्यांनाच संधी मिळाली आहे. आता या मार्केटयार्डात सर्वसामान्य माणूस सभापती होईल अशी घोषणा पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केली. या सभेसाठी कामगारांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मंचावर महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, शैलेश लाहोटी, नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, मंगेश बिरादार, गुरनाथ मगे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments