HOME   टॉप स्टोरी

अमृतच्या पाण्यासाठी विषाची परिक्षा!

अजब मनपाची गजब कहाणी, पाईप फोडतात सोडण्याआधी पाणी!


लातूर: लातूर मनपाने लातूरचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणपासून काढून घेतल्यापासून हाल उठले आहेत. २०१६ पासून हे हाल अधिक तीव्र झाले आहेत. यंदा तर कहरच झालाय. मांजरा धरणातून दोन पाटातून पाणी सोडल्यापासून ऊस जिवंत राहिला पण माणसांचे बेहाल झाले आहेत. असलेले शिल्लक पाणी जून अखेरपर्यंत पुरेल असं सांगितलं जात असतानाच मनपाच्या ढिसाळ कारभारामुळं सगळे वैतागले आहेत. लातूरच्या सावेवाडी, खोरी गल्ली भागात ०२, १२ आणि २२ तारखेला पाणी सोडलं जातं. पाणी सोडण्याच्या एक दिवस आधी मनपाचे टेंडर मिळवणार्‍या अमृतकाराची मंडळी कुठेतरी खोदून ठेवतात, पाणी सोडल्यानंतर कधी वॉल्व उडून जातो तर कधी रस्त्यावर पाणी येतं. मग पाणी वाया जाऊ नये म्हणून ‘वरुन’ बंद केलं जातं. झालं! त्या भागात पाणीच मिळत नाही. पुन्हा पुढच्या दहा दिवसांची वाट बघावी लागते. या संदर्भात काही लोक नगरसेवकाला भेटले. समोरच्या लाईनमधून आम्हाला नवीन जोडणी द्या असं म्हणाले. त्यावर वडार वस्तीला पाणी मिळणार नाही, पुढे मुस्लीम वस्तीला पाणी पुरणार नाही असं या नगरसेवकानं सांगितलं. पारंपारिक मतदारांचं लांगुलचालन कसं केलं जातं याचा हा छोटासा पुरावा! आज काहीजणांनी तणतणाट केल्यावर मनपाचे एक अभियंते आले. लवकर काम करतो म्हणाले. तेवढ्यात स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती आले. त्यांच्या प्रभागातही राजधानी टाकीवरुनच पुरवठा होतो. त्यांच्या प्रभागातही असेच असल्याचे त्यांनी सांगितले. आता मनपा आणि स्थायी सभापतीत जुंपणार हे लक्षात आल्यावर सावेवाडी, खोरी गल्ली भागातील लोकांनी काढता पाय घेतला! लातुरच्या या सावेवाडी-खोरी गल्ली भागातील नगरसेवक आहेत अशोक गोविंदपूरकर, राजा मनियार, रेहाना बासले आणि सपना किसवे. बासले बर्‍याचदा घटनाप्रसंगी आल्या. बाकिच्यांना अजून सवड मिळालेली नाही.


Comments

Top