लातूर: आज दुपारी रिंग रोडवर झालेल्या अपघातात एकाचं निधन झालं. मुरुम घेऊन जाणार्या टिप्परने धडक दिल्याने हा प्रकार घडला. पिडीताचा मेंदू लगेच बाहेर पडला. जागीच निधन झाले.
लातूर तहसिलच्या गौण खनिज विभागातील कारकून रमेश घनगावकर दुपारी जेवणासाठी बाहेर पडले. रेणापूर नाका ते गरुड चौक या रिंग रोडवर घनगावकर यांचं घर आहे. घराकडे जाताना वाटेत गरुड चौकाकडे मुरुम वाहून नेणारा टिप्पर समोर आला. या टिप्परजवळून जाताना समोरुन एक वाहन आले. त्याला चुकवताना टिप्परचा धक्का लागला. या धक्क्याने घनगावकर जागीच कोसळले, त्यांचा मेंदू बाहेर आला. ते जागीच गतप्राण झाले, असे या भागातील प्रत्यक्षदर्शी सांगतात.
तातडीने त्यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यात हलवण्यात आला. घटना समजताच विभागीय दंडाधिकारी रामेश्वर रोडगे, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचार्यांनी दवाखान्यात गर्दी केली. घनगावकर यांचं शवविच्छेदन उद्या सकाळी होण्याची शक्यता आहे. दरम्यान विवेकानंद पोलिसांनी हा टिप्पर जप्त केला आहे. अलिकडे गौण खनिजांची तस्करी करणारे तहसीलच्या कर्मचार्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातलाच हा प्रकार असावा काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments