लातूर: सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर शहरात शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकमात्र पर्याय असणाऱ्या उजनीचे पाणी मिळविण्यासाठी लातूरकर सरसावले आहेत. ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांनी उभारलेला राजकीय उपक्रम जोर धरत आहे. विशेष म्हणजे कोणाचाही चेहरा नसताना सामान्य लातूरकरांनी दाखवलेला सहभाग अभूतपूर्व आहे. उजनीचे पाणी लातूरला मिळावे याची निवेदन लातूरकरांच्या वतीने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय जनशक्ती मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांना यापूर्वीच पाठवण्यात आले आहे. जलाग्रही लातूरच्या वतीने सामान्य लातूरकरांना एकत्रित करून उजनीच्या पाण्याकरिता आग्रही भूमिका घेण्यात येत आहे. यात सर्वसामान्य लातूरकर हिरिरीने सहभाग घेताना दिसून येत आहेत.
याच अनुषंगाने आज अष्टविनायक हॉल येथे पार पडलेल्या व्यापक बैठकीत पुढील दिशा ठरविण्यात आली. केवळ घोषणा होईपर्यंत नव्हे तर ठोस कारवाई होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह महानगरपालिकेच्या वतीने उजनीचे पाणी मिळविण्यासाठी ठराव घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकरांनी शक्य त्या मार्गाने केंद्र शासन व राज्य शासना पर्यंत आपली मागणी नोंदवून सकारात्मक दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस लातूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात विक्रांत गोजमगुंडे, प्रदीप गंगणे, सूरज राजे, धनंजय भिसे, संतोष गिल्डा, कुणाल शृंगारे, चेतन कोले, अमर रेड्डी, शुभम जटाळ, विवेक सौताडेकर, बीआर पाटील, रघुनाथ मदने, अनिल पुरी, सुधीर नलवाड, रामभाऊ चलवाड, राधाकृष्ण कासले, वैशाली जाधव यांच्यासह अनेक लातुरकरांचा समावेश होता. मागणीला अधिक बळ मिळावे याकरिता तमाम लातूरकरांच्या वतीने उजनीचे पाणी मिळावे अशी विनंती करणारे २५००० पोस्टकार्ड राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत. जलाग्रही लातूरच्या वतीने ९७६५७ ००००० या क्रमांकास मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात अवघ्या २४ तासात २२०९४ लातूरकरांनी सहभाग नोंदवला. याची संपूर्ण माहिती केंद्र व राज्य सरकारकडे दररोज पाठविण्यात येत आहे.
जलाग्रही लातूर या चळवळीचा काही अंशी शासन दरबारी सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. जलाग्रही लातूरची नोंद घेण्यात येत असल्या बद्दल त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले. परंतु यावर ठोस कारवाई व्हावी हीच लातूरकरांची अंतिम मागणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उजनीचे पाणी लातूरला मिळावे व लातूरचा कायमचा दुष्काळ मिटावा यासाठी सामान्य लातूरकरांनी शक्य त्या मार्गाने प्रयत्न चालू ठेवावेत व ठोस कृती झाल्याशिवाय तसेच उजनीचे पाणी लातूरला देण्याचे कार्यादेश निघाल्याशिवाय ही चळवळ न थांबवण्याचा निर्णय सामान्य लातूरकरांनी घेतला आहे.
Comments