HOME   टॉप स्टोरी

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण

कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पिडीतेनं मांडली माध्यमांसमोर व्यथा


लातूर: लग्नाचे आमीष दाखवून आपल्या मित्रानेच वारंवार शारीरिक शोषण करून नंतर लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी आपण लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात रितसर तक्रार दाखल केली असता, पोलीस संबंधित आरोपीवर तात्काळ कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहेत. एवढेच नव्हे तर पोलिसांकडूनही आपल्यासोबत आपत्तीजनक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप पिडीत तरुणी नेहा अभयकुमार सुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देताना नेहा सुरी यांनी सांगितले की, आपण पटना, बिहार येथील रहिवासी असून १८ डिसेंबर २०१२ रोजी कोलकाता येथील इरेक्सोन कंपनीत काम करीत होते. त्याच कंपनीत पटण्याचाच रहिवाशी असलेला आशिष बृजभूषण पांडे हा तरुणही काम करीत होता. एकत्रित काम करीत असतांना दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले. दरम्यानच्या काळात मार्च २०१३ मध्ये आम्ही दोघे फिरण्यासाठी शिमला येथे गेलो होतो. त्या प्रवासात आशिषने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली. आपण त्याची मागणी धुडकावून लावली व हे सर्व लग्नानंतर होईल, असे सांगितले. तेव्हा आशिषने तेथील एका मंदिरात नेऊन पुजाऱ्यासमोर आपल्याला कुंकू लावले व आता आपण पती पत्नी झालो आहोत, असे सांगून आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर जेव्हा जेव्हा आपण त्याच्यासोबत लग्नाचा विषय काढला, तेव्हा तेव्हा त्याने कांही ना कांही कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. आशिषकडून लग्नाला टाळाटाळ केली जात असल्याचे पाहून आपण हा विषय आपल्या वडिलांना सांगितला. माझे वडील आशिषच्या वडिलांना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी, बृजभूषण पांडे यांनी माझ्या वडिलांना तुम्ही खालच्या जातीचे आहात असे बोलून अपमानजनक वागणूक दिली. तर आशिषच्या आईने, रंजनाकुमारी यांनी पन्नास लाख रुपयांची मागणी केली. आपणही याबाबतीत त्याच्या परिवाराला भेटण्यासाठी गेलो असताना आपल्यालाही आशिषच्या कुटुंबियांनी शिवीगाळ करून घरातून हाकलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नेहा सुरी यांनी सांगितले.
आशिष पांडे हा सध्या लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयाजवळील एसबीआयच्या शाखेत कार्यरत आहे. आपल्याला लग्न करू असे सांगून २३ मार्च २०१९ रोजी त्याने लातूरच्याच अंबाजोगाई रोडवरील हॉटेल गोल्ड एम्बॅसी येथे ठेवले. माझ्याकडून लग्नाची नाटकी तयारी करून घेतली. दरम्यानच्या काळात मी गर्भवती असलेला वैद्यकीय अहवाल त्याने आपल्या मुंबईच्या अमनप्रीत कौर नावाच्या मित्राला व्हाट्सअप वर पाठवून रिपोर्टच गायब केला. एवढेच नव्हे तर माझ्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार देऊन त्याने मला भररस्त्यात मारहाणही केली आहे. याबाबतीत आपण शिवाजीनगर पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली असताना पोलिसांकडूनही सहकार्य तर सोडाच, उलट आपत्तीजनक वागणूक मिळाली. एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याला मॅडम, अशी कामे केवळ पैसे दिल्याने होत नसतात, त्यासाठी आणखीही कांही करावे लागते, असे बोलून आपल्याला अपमानित केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपी आशिषला न्यायालयाने सध्या अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याला हा जामीन आपल्यासोबत लग्न करण्याच्या अटीवरच न्यायालयाने मंजूर केला असल्याचे सुरी यांनी नमूद केले. जामीन आता मंजूर झाला असला तरी या अगोदर पोलिसांनी त्याला अटक का केली नाही? असा आपला सवाल असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकरणात आशिषने माझ्यासोबत लग्न करण्याच्या अटीवर अंतरिम जामीन मिळवला असून आपण जेथे जेथे जातो, तेथे त्याने तसेच त्याच्या हस्तकांनी माझा पाठलाग केला आहे. त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. आपली फसवणूक करणाऱ्या आशिष पांडे, त्याचे वडील बृजभूषण पांडे, आई रंजनाकुमारी पांडे, लहान बहीण श्रुती पांडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व आपल्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही नेहा सुरी यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकरणी आपण राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितल्याचे सांगून आपल्याला सहकार्य करण्याऐवजी आपल्यासोबत आपत्तीजनक व्यवहार करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावरही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, तसेच आशिषपासून आपल्या जीवाला धोका असल्याने आपल्याला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली असे पत्रकार श्रीधर स्वामी यांनी पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


Comments

Top