HOME   टॉप स्टोरी

मराठवाडयाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार

मराठवाडा विकास परिषदेत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे आश्वासन


मराठवाडयाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार

लातूर: मराठवाडा महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यापासूनच मराठवाडयाचा सर्वच क्षेत्रात विकासाचा अनुशेष वाढतच राहिला आहे. मराठवाडा व येथील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विकासाचा अनुशेष भरुन काढण्यात येईल व मराठवाडयाला उजनीचे पाणी मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. येथील दयानंद सभागृहात आयोजित मराठवाडा विकास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार विनायक पाटील, आमदार प्रशांत बंब, आमदार सुभाष साबने, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, ॲड मनोहर गोमारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, मराठवाडयाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहीजे. लातूरसह मराठवाडयातून इतरत्र होणारे ब्रेन ड्रेन थांबविण्यासाठी येथेच त्याप्रकारच्या व्यवस्था निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरसह मराठवाडयात दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या जात असून या पुढील काळात या भागातील एकही कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करणार नाही याकरिता उपाय योजना राबविण्यात येतील. तसेच उजनीच्या पाण्यासह संपूर्ण मराठवाडयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे निलंगेकर यांनी सांगून मराठवाडयाचा विकासाचा अनुशेष राहण्यास यापूर्वीचे नेतृत्वच जबाबदार होते, असे मत व्यक्त केले.
पीक पध्दतीत बदल करावा :
मराठवाडयात पावसाचे प्रमाण कमी असून जमीनीतील शेकडो वर्षापासून साठलेले पाणी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपसा केले असल्याने या भागात मोठया प्रमाणावर पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन स्वयंप्रेरणेने ऊसपीक न घेता इतर कमी पाण्यावर येणारी पिके घेऊन आपल्या पारंपारिक पीक पध्दतीत बदल केल्याशिवाय या भागाला पाण्याची समृध्दी येणार नसल्याचे प्रतिपादन जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले. यावेळी आमदार सुरजित सिंह ठाकूर, आमदार प्रशांत बंब, डॉ. वाघमारे यांनी ही मराठवाडयाचा विकासाचा अनुशेषच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण मते मांडली. प्रारंभी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन मराठवाडा विकास परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲङ गोमारे यांनी केले. तर परिषदेच्या आयोजनाचा उद्देश शिवाजी पाटील कव्हेकर यांनी सांगितला.


Comments

Top