HOME   टॉप स्टोरी

अनेक डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेर लावल्या बंदच्या पाट्या

डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद


लातूर: डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला सोमवारी लातुरात जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयएमएच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. प्रत्येक डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार करण्याचा
प्रयत्न करीत असतो. अशावेळी रुग्ण व डॉक्टरांच्या नात्यात कोणताही गैरसमज निर्माण होणे हिताचे नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान लातूरातील सर्व रुग्णालयांबाहेर बंदची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते मुख्य प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली होती.
आयएमएच्या वतीने सोमवारी जिल्ह्यातील बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. या बंदमध्ये डॉक्टरांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात आल्या होत्या, असे सांगून डॉ. अजय जाधव पुढे म्हणाले की, कोणताही तज्ज्ञ डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णावर चांगल्यात चांगले उपचार करण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र रुग्णाचा जीव वाचवणे डॉक्टरच्या हाती नसते. एखाद्यावेळी उपचारादरम्यान रुग्ण दगावला तरीही त्याच्या नातेवाईकांनी आपल्या भावना अनावर न होऊ देता सर्व कांही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रुग्ण अत्यवस्थ वा गंभीर अवस्थेत असल्याची पूर्वसूचना त्याच्या नातेवाईकांना अगोदरच दिलेली असते. नातेवाईकांनाही त्याची संपूर्ण कल्पना असते. तरीही भावनेच्या भरात त्यांच्याकडून अशी आक्षेपार्ह कृती घडते. रुग्णांवर कितीही चांगले उपचार करूनही अशा प्रकारची अनुचित घटना घडत असेल तर भविष्यात कोणताही डॉक्टर गंभीर प्रकृतीच्या रुग्णाला आपल्या रुग्णालयात दाखल करून घ्यायला तयार होणार नाही वा हल्ल्याच्या भीतीपोटी त्याच्यावर उपचारही करायला तयार होणार नाही. ही बाब समाजासाठी तसेच मानवतेच्या दृष्टीनेही योग्य ठरणार नाही. या प्रश्नी सरकारनेही तात्काळ कठोर कायदा करणे गरजेचे आहे, हे सांगताना डॉ. अजय जाधव यांनी स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात याबाबतीत कायदा केल्याची आठवण करून दिली. उपचारादरम्यान डॉक्टरांकडून एखादेवेळी अनावधानाने कांही त्रुटी राहू शकते. अशावेळी संबंधित रुग्णाचे नातेवाईक वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाकडे तक्रार करू शकतात. वैद्यकीय उपचार करणे सोयीचे व्हावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने वैद्यकीय विमा सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी केले. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कायदा करावा. वर्ल्ड मेडिकल असोसिएशननेही या मागणीला पाठिंबा देऊन सर्वच सदस्य देशांनीही अशा प्रकारचे हिंसाचार
रोखण्यासाठी तातडीने कडक कायदे करण्याची मागणी एका ठरावाद्वारे केल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. यावेळी आयएमएचे सचिव डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. डी.एन. मंदाडे, डॉ.गिरीश कोरे, डॉ. चेतन सारडा, डॉ. ज्योती सूळ, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. चांद पटेल, डॉ. कांचन जाधव, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. दीपक गुगळे, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अशोक
आरदवाड, डॉ. डी. एन.चिंते, डॉ. सूर्यकांत निसाले, डॉ हंसराज बाहेती, डॉ. विश्वास कुलकर्णी,डॉ. रमेश भराटे, डॉ मोहिनी गानू, डॉ. कल्पना किनीकर, डॉ. बी. बी. यादव, डॉ. श्याम
सोमाणी, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. शिवाजी काळगे, डॉ. राजकुमार दाताळ, डॉ. हमीद चौधरी, डॉ संजय पौळ, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. आमीर शेख, डॉ. आनंद गोरे, डॉ. सचिन चव्हाण यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.


Comments

Top