लातूर: लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात पाऊस झाला नाही. त्यामुळे लातूर शहराला केल्या जाणार्या पाणी पुरवठयात कपात करण्यात येत असून माहे सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा केला जाईल. शहराची पाण्याची गरज पुरवण्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यांयी पाणी पुरवठा योजनांचे काटेकोर नियोजन तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित साप्ताहिक टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, भूजल वरिष्ठ भूवैज्ञानिक भा. ना. संगनवार, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, महापालिका उपायुक्त संभाजी वाघमारे, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जलसंपदा विभागाचे अधिकारी, गट विकास अधिकारी, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लातूर शहराला पाणी पुरवठा सुरळित चालू ठेवण्यासाठी वॉटर ट्रेन, उस्मानाबाद येथून उजनीचे पाणी टँकरने आणणे व इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठयाची व्यवस्था व नियोजन महापालिका व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. महापालिका, महावितरण, पाणी पुरवठा विभाग यांनी रेल्वे ट्रेनसाठी जागेवर जाऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिकांच्या पाणी पुरवठयामध्ये १५ टक्के पाणी कपात करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. महावितरण कंपनीने टंचाईच्या काळात लातूर महापालिका तसेच इतर कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकीसाठी खंडित करु नये. असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. या टंचाईच्या भीषण परिस्थितीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तलाठी, व ग्रामसेवक यांनी टंचाईच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दयावे. तसेच तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवडयाला तलाठी व ग्रामसेवकांची टंचाईबाबत बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांची सविस्तर माहिती ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
Comments