HOME   टॉप स्टोरी

मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं!

लातुरकरांना पावसाची भिती वाटतच नाही, छत्री न घेताच निघतात!


लातूर: पश्चिम महाराष्ट्र संपन्न आहे. सगळ्यांनाच त्याचं आकर्षण आहे. तशीच भुरळ पावसालाही पडली आणि त्यानं पश्चिम महाराष्ट्राला धुवून काढलं. मध्येच पावसाला मराठवाड्याची आठवण येते आणि मंत्र्यांच्या धावत्या दौर्‍यांप्रमाणे तो लातुरकरांना तोंड दाखवून जातो. मंत्रीही कधी कधी लातुरच्या मुक्कामी येतात. दिवस दोन दिवस राहतात पण पावसाला लातुरात मुक्काम करावासा वाटत नाही. लातुरकरांनाही त्याचं काहीच वाटत नाही. भर पावसाळ्यातही लातुरकर छत्रीविना बाहेर पडतात. आई मुलाला शाळेत जाताना पांघरायला काही द्यायला तयार नसते. एकूणच सगळ्यांनाच खात्री झाली आहे. कितीही ढग येवोत पाऊस काही पडणार नाही. आला तर दहा-पंधरा मिनिटात निघून जातो. ज्या प्रमाणे मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं त्याचप्रमाणे लातुरकरांना पावसाची भिती वाटत नाही!
आता जरा भीषण टंचाईचं वर्ष अर्थात रेल्वेनं पाणी आणलेलं वर्ष अर्थात २०१६ पासूनची आकडेवारी पाहुयात. कडाक्याच्या पाणी टंचाईला तोंड देणार्‍या लातुरकरांना पावसाने त्याच वर्षी बक्षीस दिलं. ८०२ सरासरी असताना १११० मिलीमीटर बरसून गेला. मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडावे लागले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यानं वसुली केली, केवळ ६८७ मिलीमीटर टक्केवारी देऊन गेला. २०१८ मध्ये त्यानं पुन्हा जुनं कर्ज वसूल केलं, ५१५ मिलीमीटरच्या पुढे गेला नाही. यंदा तर कहरच केला ऑगस्ट महिना संपत आला तरी ३५ टक्क्यांच्या पुढे सरकला नाही. आपल्याला परतीच्या पावसाची अपेक्षा असते. मागच्या वर्षी तो परत आलाच नाही, कुठे पाकिस्तानात गेला की अफगाणिस्तानात अजून सीबीआयलाही पत्ता लागला नाही.


Comments

Top