लातूर: भारतीय जनता पक्ष संघाच्या इशार्यावर चालतो. या दोघांचाही आरक्षणाला विरोध आहे. त्यांना मनुवादी व्यवस्था आणायची असल्यानेच ओबीसींच्या आरक्षणात कपात झाली असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या देखरेख समितीचे प्रमुख अर्जून सलगर यांनी केला. पत्रकार भवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुळातच संघाला आरक्षण व्यवस्था नको आहे. त्यामुळेच आरक्षणाची समिक्षा व्हायला हवी असं विधान अलीकडेच संघप्रमुख मोहन भागवतांनी केलं होतं. या देशात ३५० हून अधिक ओबीसींच्या जाती आहेत. या जाती विखुरलेल्या आहेत. त्यांच्याकडे ऐक्य तर नाहीच, नेतृत्वही नाही. त्यांचा आवाज सभागृहापर्यंत पोचत नाही म्हणून फडणवीस सरकारने थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसींचे आरक्षण कमी केले. देशभर जो प्रयोग करायचा आहे त्याची चाचणी महाराष्ट्रात घेण्यात आली असाही आरोप सलगर यांनी केला. या पत्रकार परिषदेला देखरेख समितीचे दीपक मोरे आणि अतुल बहुलेही उपस्थित होते. या समितीने औरंगाबादपासून देखरेख सुरु केली आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांतील समन्वय, स्थानिक पातळीवर सुरु असलेली कामे, घटक पक्षातील समन्वय याची पाहणी ही समिती करीत आहे.
Comments