HOME   टॉप स्टोरी

मुख्य बाजारपेठेने पाळला बंद, शाळा तशाच सुरु

गोलाईत जमले कार्यकर्ते, बंदसाठी फार श्रम करावे लागले नाहीत!


लातूर: लातुरकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर नागरिक हक्क कृती समितीने आज बंद पुकारला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास २०-२५ कार्यकर्ते गंजगोलाईत जमले. सराफ लाईनला फिरले, गोलाईला चक्कर मारली. सगळं काही बंदच होतं. विषय लातुरकरांच्या हिताचा असल्यानं लातुरकरांनी मनातून बंद पाळायचं ठरवलं होतं. राजस्थान, बंकटलाल, लाहोटी, देशीकेंद्र, गोदावरी आदी अनेक शाळा नेहमीप्रमाणे सुरु होत्या. चौकशी केली असता बंदचं आवाहन करायला कुणीच आलं नाही, शाळा कशी बंद ठेवायची? असा प्रश्न संबंधितांनी केला. मनपाने जाचक मालमत्ता करवाढ थांबवावी, वाढीव वीज बिले रद्द करावीत आणि दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. लातुरकरांच्या हितासाठी हा बंद असला तरी कमकुवत नियोजनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे बंद प्रभावी होऊ शकला नाही. उदय गवारे, प्रदीप गंगणे, रईस टाके, कुणाल वागज, रणधीर सुरवसे यांच्यासह अनेकजण सहभागी होते. या बंदला आमदारांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. पण बंदच्या आवाहनकर्त्यांची संख्या अतिशय कमी होती. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड भागात बंद दिसला नाही! एकूणच नियोजनाचा अभाव दिसून आला.


Comments

Top