लातूर: स्वच्छ मिशन योजने अंतर्गत आज लातूर महानगरपालिकेला २५ नवीन घंटागाड्या मिळाल्या. आणखी ५९ गाड्या लवकरच मिळणार आहेत. प्रत्येक प्रभाग स्वच्छ राहिला पाहिजे. त्यासाठी लागणारी यंत्रणा पारदर्शक असली पाहिजे असे मनपा आयुक्त एमडी सिंह यांनी सांगितले. टाऊन हॉलच्या मैदानावर या गाड्या लावण्यात आल्या होत्या. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या गाड्यांचं उदघाटन म्हणून एक गाडी चालवली. त्याला महापौर सुरेश पवार, आयुक्त सिंह, नगरसेवक हनुमंत जाकते यांनी हिरवा झेंडा दाखवला. पालकमंत्र्यांसोबत देवीदास काळे आणि दीपक मठपतीही बसले होते. लातुरला मंजूर झालेल्या या गाड्या अतिशय कमी कालावधीत आल्या आहेत. यावर ०४ कोटी ४६ लाखांचा खर्च होत आहे. प्रत्येक घंटागाडीचे काम पारदर्शक व्हावे यासाठी प्रत्येक गाडीवर जीपीएस यंत्रणा आणि लाऊड स्पिकर्स लावण्यात येणार आहेत. या गाड्या व्यवस्थित काम करीत आहेत की नाही यावर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाणार आहे असेही आयुक्तांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती यांनी लक्ष घालून त्वरेने काम केल्याबद्दल त्यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी उप महापौर देवीदास काळे, नगरसेवक व्यंकट वाघमारे, रागिनी यादव, सुनील मलवाड, शिरीष कुलकर्णी, मनोज सूर्यवंशी, शैलेश लाहोटी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. पालकमंत्र्यांनंतर रागिनी यादव यांनीही एक घंटागाडी चालवून पाहिली.
Comments