लातूर: जे जे गेले त्या सगळ्यांचं भलं होवो, तुम्ही आहात ना? आता चार वर्षे थांबावं लागणार नाही, महिनाभर थांबावं लागेल. येणार्या काळात नव्या नेतृत्वाची नवी फळी तयार करायची आहे, नव्या पिढीला स्वाभिमानाचा इतिहास शिकवायची गरज असताना त्या जागी तुम्ही दारुचे धंदे काढता, शरम वाटली पाहिजे, अशा लोकांच्या हाती सत्ता द्यायची नाही असे आवाहन शरद पवार यांनी केले. ते लातुरात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांनी सत्तर वर्षात काय केले? असा प्रश्न अमित शाह विचारतात, महाराष्ट्रात शरद पवार यांनी जेवढी विमानतळं बांधली तेवढे बस स्टॅंड सुध्दा गुजरातेत नाहीत. महाराष्ट्राच्या या पुरोगामी मातीत भारतीय जनता पक्षाला गाढल्याशिवाय राहणार नाही. राजे गेले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पदापेक्षा महाराजांची गादी मोठी आहे. ज्या पंतांनी शिवशाहीत भांडणं लावली त्याच आनाजींना महाराजांचे वंशज शरण जातात यासारखे दुसरे दु:ख माझ्यासारख्या शिवभक्ताला असू शकत नाही असे धनंजय मुंडे म्हणाले. मुंडे आणि पवारांनी आपल्या भाषणात भाजपावर जोरदार टीका केली. अमित शाहांचा समाचार घेतला. मुक्ताई मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. जनार्दन वाघमारे, आ. विक्रम काळे, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब पाटील, बसवराज पाटील नागराळकर, अफसर शेख, मकरंद सावे, संजय बनसोडे, संजय शेटे, डीएन शेळके, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments