लातूर: वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. आपण स्वतः निलंगा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असून या मतदारसंघात आपण पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांशी दोन हात करायला सज्ज
असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, परिषदेस आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजा मणियार, औसा मतदार संघाचे उमेदवार प्रा. सुधीर पोतदार आदींची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडी निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या उमेदवाराबाबत व्यक्तिगत टीका टिपण्णी करणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर आघाडी हे निवडणूक लढवणार आहे असे सांगून डॉ. भातांब्रे पुढे म्हणाले की, समाजात मोठ्या संख्येने असणाऱ्या बहुजन समाजाला आतापर्यंत विकासापासून दूर ठेवण्याचे काम प्रस्थापितांकडून करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजाला सर्वंकष न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांसह प्रयत्नशील आहोत. या निवडणुकीत आघाडी लातूर जिल्हयातील सहाही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. पहिल्या यादीत राजा मणियार आणि प्रा. सुधीर पोतदार यांची नावे घोषित झाली असून अन्य मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा लवकरच होणार आहे. आपण स्वतः निलंगा मतदार संघातून निवडणूक लढविणार असून या मतदार संघात आजघडीला वंचित बहुजन आघाडी पहिल्या क्रमांकावर आहे, असेही डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी यावेळी बोलतांना आघाडीची निवडणुकीबाबतची भूमिका विशद केली. लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित झालेले राजा मनियार यांनी यावेळी आपले विचार मांडताना आपण या निवडणुकीला सर्वसामान्य मतदारांचा प्रतिनिधी म्हणून
सामोरे जात आहोत. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय व सामाजिक प्रवासात सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. येणाऱ्या काळातही आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू. सामान्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यास प्राधान्य देऊ असेही मणियार म्हणाले. प्रा. पोतदार यांनीही यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.
Comments