HOME   टॉप स्टोरी

अमित देशमुख, बसवराज पाटील यांची उमेदवारी कायम

कॉंग्रेसच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर, निलंगातून अशोकरावांना संधी


अमित देशमुख, बसवराज पाटील यांची उमेदवारी कायम

मुंबईः कॉंग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. लातुरातून अमित देशमुख, औशातून बसवराज पाटील, निलंगातून अशोकराव पाटील, सोलापुरातून प्रणिती शिंदे, भोकरमधून अशोकराव चव्हाण यांची नावे घोषित झाली आहेत. लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांना टक्कर देणारा उमेदवार नाही. पण बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर ही निवडणूक त्यांना सोपी नाही. सबंध राज्यात वंचितच्या रुपाने कॉंग्रेससाठी मोठी डोकेदुखी तयार झाली आहे. ती विसरता येणार नाही. अमित देशमुख यांना चॅलेंज नाही असं सरसकट बोललं जातं. पण हे चॅलेंज विजयात रुपांतरीत करणेही सोपे नाही.
औशात यंदा मोठी गर्दी झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार दंड ठोकून उभे आहेत. दिनकर माने दावा सोडायला तयार नाहीत. संतोष सोमवंशींनाही यंदाची संधी घ्यावी वाटते. या पार्श्वभूमीवर औसा कुणाला सुटते याला महत्व आहे. ज्यांना कुणाला ‘सुटले’ नाही ती मंडळीही स्वस्थ बसणार नाही! त्यातच निलंगा तालुक्यातील ६०-६५ गावं औसा मतदारसंघात आहे. हा मुद्दाही विसरता येणार नाही. अहमदपुरातही मोठी गर्दी झाली आहे. उदगीरात भालेरावांचं काही खरं दिसत नाही अशी चर्चा ऐकायला मिळते. निलंग्यात काका-पुतण्याच्या लढाईला महत्व आले आहे. ही लढाई पारंपारिक असली तरी संभाजीरावांची बाजू भक्कम आहे. खाली-वर दोन्हीकडं भाजप. त्यात पालकमंत्रीपद आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू या बाजू मोठ्या जमेच्या आणि भक्कम आहेत. लातूर ग्रामीणमधली उलथापालथ भाजपला मारक ठरु शकते. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या साखर कारखान्यांचं प्राबल्य आहे. अतिशय शांतपणे, मजबूत प्रचार आणि भेटीगाठी सुरु आहेत.
युती आधीच अक्षता!
भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर होण्याआधीच शिवसेनेने १४ उमेदवारांना एबी फॉर्म देऊन टाकले. आज भाजपा आपल्या उमेदवारांना असेच फॉर्म देणार आहे. कॉंग्रेसचे सहा आमदार आज भाजपात येणार आहेत. ०२ ऑक्टोबरला राणे पिता पुत्र भाजपवासी होतील अशी चर्चा आहे. राज्याचं चित्र आजच्या घडीला तरी अनाकलनीय आहे. येणार्‍या काळातील घडामोडी दिशा स्पष्ट करु शकतील.


Comments

Top