HOME   टॉप स्टोरी

भाजपा सरकार स्थापन करणार नाही!

शिवसेनेला दिल्या शुभेच्छा, नव्या पर्वाला सुरुवात, शिवसेनेची होणार कसरत!


भाजपा सरकार स्थापन करणार नाही!

मुंबई: आज वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत वेगाने विचार विनिमय झाला. नेते थेट राजभवनावर गेले. त्यांनी राज्यपालांना सांगून टाकलं आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही! याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन करुन टाकली. यावेळी देवेंद्र फडणवीस नव्हते हे विशेष. आता शिवसेनाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण मिळणार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आधार घेऊन शिवसेनेला सरकार स्थापन करावे लागणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार हे नक्की. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या या तिघाडीचे कोण मुख्यमंत्री असतील, कोण उप मुख्यमंत्री असतील, किती वर्ष असतील, गृहमंत्री कुणाचा, कायदा मंत्री कुणाचा, महसूल कुणाकडे आणि नगरविकास कुणाकडे याच्या बातम्या बराच काळ चालत राहतील. ही तीन चाकी राजकारणातील खड्ड्यांवर कशी मात करील हे आता रंजक ठरणार आहे. तीन चाकीचा एक्सलेटर, ब्रेक आणि क्लच एकाकडेच असू शकेल पण रिव्हर्स गियरवर मात्र शिवसेनेला लक्ष ठेवावे लागेल आज दिवसभरात भाजपाच्या दोन बैठका झाल्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. अतिशय कमी वेळेत बैठक आटोपली. तिथे उपस्थित माध्यमांशी न बोलता सगळे नेते राजभवनाकडे गेले, राज्यपालांची भेट घेतली आणि आम्ही सरकार बनवू शकत नाही असे सांगून टाकले.
या निर्णयामुळे अनेक राजकीय संदर्भ बदलणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची वैचारिक बैठकही बदलणार आहे. पक्ष आणि विचार हे गणित तर आधीच बिघडले आहे. ते आणखी स्पष्ट होणार. कुठेही जा पण सत्तेच्या खुर्चीवर या हा नवा राजकीय विचार ‘अंडरलाईन झाला’!
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससारख्या ‘सराईतां’सोबत पाच वर्षे संसार करणे शिवसेनेला कितपत जमेल हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण दोन्ही कॉंग्रेस मिळून शंभरावर जातात. त्यांच्यापुढे शिवसेनेच्या आमदारांची संख्या जवळपास अर्ध्यावर आहे. शिवसेनेने महाजनादेशाचा अवमान केला असा थेट आरोप भाजपा नेते करीत आहेत.


Comments

Top