लातूर: राज्याच्या राज्यपालांनी रात्रीतून सरकार स्थापन करण्यात रात्रीचा दिवस केला असा हल्ला चढवत, राज्यपाल कोशारींनी आता महाराष्ट्रातील शेतकर्यांना जाहीर केलेली हेक्टरी आठ हजारांची नुकसान भरपाई तरी त्वरीत देण्याची हुशारी दाखवावी, शेतकर्यांना पीक विमा तात्काळ द्या, अशी मागणी लातूर तहसीलपुढे ढोला ताशाचा गजर करत केली असून, यासंदर्भातले विविध मागण्यांचे निवेदन शिवसैनिकांनी तहसीलदारांमार्फत सादर केले.
शिवसेनेचे ग्रामीण लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, महिला आघाडी जिल्हा संघटक, माजी जिल्हा प्रमुख पप्पू कुलकर्णी आदिंच्या नेतृत्वात राज्य शासनाच्या विरोधात ढोल ताशांच्या गजरात प्रशासनाला जागे करण्यासाठी लातूर तहसीलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यपालांना तहसीलमार्फत निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अतिशय तुटपुंजीजी मदत जाहीर झाली. ती आठ हजार प्रतिहेक्टरी एवढी असून, ती शेतकर्यांची अवहेलना आहे. ही मदत वाढवून हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे द्यावी, भरलेला खरिपाचा पिकविमा तात्काळ मंजूर करुन पिकविम्याच्या रकमा अदा कराव्यात, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकर्यांना नवीन कर्ज रब्बी पेरणीसाठी देण्यात यावे, बँकेची थकीत कर्जवसुली थांबवावी, शेतकर्यांचे वीज बिल माफ करावे, शैक्षणिक शुल्क माफ करावे, या मागण्यांची ०२ डिसेंबर पर्यंत सोडवणूक नाही झाली तर शिवसेना आपल्या पध्दतीने आंदोलन करील असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष कुलदिप सूर्यवंशी, राहूल मातोळकर, उपजिल्हा शिवेसना प्रमुख विष्णु साबदे, शंकर रांजणकर, बाळासाहेब डोंगरे, शिवसेना तालुका प्रमुख रमेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख रमेश माळी, शिवसेना महानगर प्रमुख विष्णु साठे, शिवसेना महानगर संघटक नागेश स्वामी, विधी आघाडी जिल्हा संघटक वैभव बिराजदार, व्यापारी आघाडी जिल्हा संघटक बसवराज मंगरुळे, महाराष्ट्र अॅटोरिक्षाचालक सेनेचे त्र्यंबक स्वामी, शिक्षक सेनेचे शरद हुडगे, बँक कर्मचारी महासेना महासंघाचे जिल्हा संघटक सी. के. मुरळीकर, व्यापारी आघाडीचे उपशहर प्रमुख एस. आर. चव्हाण, पवन जोशी, राजेंद्र कतारे, पद्माकर भगाडे, सुधाकर कुलकर्णी, माधव कलमुकले, रोहित दोपारे, शिवराज मुळावकर, राहूल रोडे, सुनील फुलारी, दिलीप सोनकांबळे, प्रदीप बनसोडे उपस्थित होते.
Comments