लातूर: औशाचे आमदर अभिमन्यू पवार यांच्या निवडीला ‘कुणीतरी’ उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनाही आव्हान देणार्याचं नाव माहित नव्हतं! शाबास आमदार! हे विकास करणार! वाचा त्यांची फेसबुक पोस्ट...
अजुन एका लढाईची काय चिंता? जनतेच्या आशीर्वादाने / प्रचंड प्रेमाने औसा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून झालेल्या माझ्या निवडीला मा. उच्च न्यायालयात आवाहन दिले गेल्याचे कळले. वाईट वाटले नाही उलट कीव आली, करत्याची आणि त्यांच्या करवित्यांचीही.
एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला हरवण्यासाठी काही स्वकीयांनीही आघाडीवर उतरून तर काहींनी बंडखोरांच्या पाठीशी उभे राहून जंग जंग पछाडले पण जनतेच्या न्यायालयात कारस्थानांची डाळ काही शिजली नाही.
जनतेच्या न्यायालयात पराभूत झालेल्यांनी पुन्हा जनतेच्या आदेशाचा अनादर करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
राजकारणात येण्याचा सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना अधिकार नाही का? राजकारण ही काही प्रस्थापित कुटुंबांचीच मक्तेदारी आहे का? एका वारकरी सांप्रदायातील, शेतकऱ्याच्या / एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या पोराला थांबवण्याचा इतका अट्टाहास...? कशासाठी? जो सामान्य कार्यकर्ता पक्ष कार्यालयातील सतरंज्या उचलायलाही सगळ्यात पुढे धावत येतो त्याने त्या सतरंजीवर बसणे अन तेही जनतेच्या आशीर्वादाने हा काही गुन्हा आहे का???
निवडणूक घोषित होण्यापूर्वी मला तिकीट मिळू नये म्हणून केलेले प्रयत्न, केलेला थयथयाट, केलेला आकांडतांडव औसाच नाही तर सबंध महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे.....
मी मात्र कायम संयम ठेवला. तिकीट मिळाल्यानंतर नियोजित बंडखोरी घडवली गेली, मी संयम ठेवला.
माझ्या प्रचारात सक्रिय न होण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांवर दबाव टाकला गेला, मी संयम ठेवला.
मला पराभूत करण्यासाठी अनेक राजकीय डाव खेळले गेले, मी संयम ठेवला.
जनतेने न भूतो न भविष्यती अशा मताधिक्याने मला आशीर्वाद दिले, भरभरून प्रेम दिले.....
आता तर त्याविरूद्धही कट कारस्थान केलं जात आहे. हा तर प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेल्या जनतेचाच अपमान आहे. पण मी पुन्हा संयमानेच याला सामोरे जाईन आणि हे दाखवून देईन की राजकारण ही काही प्रस्थापित कुटुंबांचीच मक्तेदारी नाही. मी आजवर संघर्ष करून इथवर आलोय, अजूनही संघर्ष चालू आहे आणि वाट्याला आला तर आजन्म संघर्ष करायची माझी तयारी आहे. औसा मतदारसंघाचा कायापालट करणे, विकासकामांचा बॅकलॉग भरून मतदारसंघाला सरप्लस मध्ये नेण्यासाठी माझा संघर्ष असेल. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष राहील. औसा मतदारसंघातीलच नाही तर लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी, विकासाची गंगा त्यांच्या दारात आणण्यासाठी माझी आजन्म लढाई असेल, ज्यांना लढाईच माझ्या विरोधात लढायची आहे, ज्यांना जनादेशाचा अपमानच करायचा आहे त्यांना माझ्या शुभेच्छा. ......
न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. ही न्यायालयीन लढाई सुद्धा मी जनतेच्या आणि देवाच्या अशीर्वादाने जिंकेन असा विश्वास आहे.
बाकी जनतेचे आशीर्वाद पाठीशी असताना अजून एका लढाईची काय चिंता....
जय महाराष्ट्र!
आपला,
अभिमन्यू पवार...
Comments