HOME   टॉप स्टोरी

ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला

लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची मागणी


ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला

लातूर: दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याबाबतच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी महाराष्ट्रातही केली जावी आणि राज्यातील बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ निर्बंध आणण्याची मागणी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे अन्न व औषधी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सद्यस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या ऑनलाईन बेकायदेशीर औषध विक्रीवर निर्बंध आणण्याचा आदेश देशातील सर्व राज्यांनीही अंमलात आणावा, असे निर्देश ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने दिलेले आहेत. असे असतानाही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आजही बेकायदेशीररीत्या
ऑनलाईन औषध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून भविष्यात अशी औषधी घेणाऱ्यांना असाध्य व्याधींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार त्वरित बंद होणे आवश्यक आहे. यासाठी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिशनच्या वतीने लातूरचे अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त किशोर चांडक तसेच औषध निरीक्षक योगेंद्र पौळ, सचिन बुगड यांना देण्यात आले. औषध विक्रीचा व्यवसाय हा कायद्याअंतर्गत व फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या नोंदणीकृत फार्मासिस्टच्या देखरेखीखाली होणे गरजेचे आहे. असे असताना ऑनलाईन औषध विक्रीमध्ये याची कोणतीही खात्री बाळगता येत नाही. यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने तात्काळ ऑनलाईन बेकायदेशीर औषध विक्रीवर कायदेशीर कारवाई
करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बोधकुमार चापसी, सचिव रामदास भोसले, मराठवाडा विभागीय कोषाध्यक्ष अरुण सोमाणी, अतुल कोटलवार, अंकुश भोसले, ईश्वर बाहेती, नागेश स्वामी, राजकुमार राजारूपे, अरविंद औरादे, ज्ञानेश्वर मरे, मनोज आगाशे, धनाजी तोडकर, महेश दरक, शिरीष कोटलवार यांची उपस्थित होते.


Comments

Top