लातूर: नागरिकत्व कायद्याच्या विरोधात लातुरात आज महामोर्चा निघाला. कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेला हा पहिलाच मोर्चा असावा. गंजगोलाईतून निघालेला हा मोर्चा तहसीलवर धडकला. अशोक हॉटेल चौकापर्यंत मोर्चेकरी रस्त्यावर बसलेले होते. सर्व समाज, सगळे पक्ष, सगळ्या संघटना आणि सर्व स्तरातील नागरिकांचा यात मोठा सहभाग होता. त्यातल्या त्यात मुस्लीम बांधवांची संख्या मोठी होती. तरुणांच्या सहभागाने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. मोर्चेकर्यांनी अनेक घोषणा वारंवार दिल्या. त्यात काही अप्रिय तर काही चांगल्याही घोषणा होत्या. नीमका पत्ता कडवा है....भडवा है, हिंदू-मुस्लीम भाई भाई, हमे चाहिए आजादी, मनुवाद से आजादी, दहशतवाद से आजादी, मुल्कवाद से आजादी, इन्किलाब जिंदाबाद अशा घोषणांचा त्यात समावेश होता.
स्वंयसेवकांचे मोठे योगदान
मोर्चाच्या आधी संयोजकांनी जागोजागी स्वंयसेवक उभे केले होते. मोर्चेकर्यांना कुणाचा त्रास होऊ नये आणि मोर्चेकर्यांचा इतरांना कुणाला त्रास होऊ नये याची काळजी हे स्वयंसेवक घेत होते. त्यांनी पोलिसांनाही सहकार्य केलं. मोर्चाचा आवाका लक्षात न आल्यानं पोलिस बंदोबस्त अतिशय तोकडा होता. अनेक ठिकाणी पोलीस मोर्चेकर्यांची विनवणी करताना दिसले.
बाजार बंद
या मोर्चाचा धसका व्यापार्यांनीही घेतला होता. तीन दिवसांपासून व्यापार्यांचे फोन आजलातूर कार्यालयात खणखणत होते. बंद आहे का? आम्ही काय करावं? दुकान उघडावं की नको? सराफ लाईनला काही धोका आहे का? मिरची बाजाराला-मार्केट यार्डावर काही परिणाम होईल का? असे विचारले जात होते. मोर्चा गोलाईतून निघणार असल्याने या भागातील आणि मुख्य मार्गावरील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली होती. तहसीलसमोर अनेक नेत्यांनी भाषणे केली. हा कायदा कसा अन्यायकारक आहे समजाऊन सांगितले. राष्ट्रगिताने मोर्चाची सांगता झाली. सहभागी कार्यकर्त्यांनी शांततेने घराकडे परतावे असे आवाहन करण्यात आले. या मोर्चाला सहकार्य केल्याबद्दल पोलिस आणि प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
Comments