लातूर: लातुरच्या गांधी चौकातल्या कस्तुरबा गांधी रुग्णालयानं लातूरसह आजुबाजुच्या जिल्ह्यातील लाखो महिलांची सेवा केली आहे. १९५२ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु या रुग्णालयाचं उदघाटन केलं होतं. आता हे रुग्णालय पाडून त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचं लवकरच लोकार्पण होऊ घातलं आहे. परवा लातुरचे आमदार अमित देशमुख यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूरात उभारण्यात येत असलेल्या शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी होत आली असून लातूरकरांचे हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.
लातूर शहरातील गांधी चौक परिसरात होत असलेल्या शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधकामाची पाहणी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली त्याप्रसंगी ते बोलत होते. लातूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अद्ययावत वैद्यकीय सुविधेसह शासकीस रूग्णालय उभारणी व्हावी अशी लोकनेते विलासराव देशमुख यांची संकल्पना होती. त्यांच्या संकल्पनेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे कामही अंतीम टप्यात आले आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून मराठवाडयासह सिमा भागातील नागरिकांनाही आरोग्याच्या अत्याधुनिक उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मराठवाडा व लातूरच्या दृष्टीने ही अभिमान व आनंदाची बाब असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयामध्ये न्युरोलॉजी, न्युरो सर्जरीलॉजी, कार्डीओलॉजी, सि.व्ही.टी.एस., नेप्रोलॉजी, न्युनोटोलॉजी, बर्न अॅण्ड प्लास्टीक सर्जरी आदी विभाग कार्यन्वीत होणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी यावेळी दिली. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, विरोधी पक्षनेता अॅड दीपक सूळ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा, नगरसेवक सचिन मस्के, युवक काँग्रेसचे महेश काळे, संजय निलेगांवकर, सत्तारभाई शेख, राज क्षिरसागर, व्यंकटेश पुरी, सिकंदर पटेल, देवीदास बोरुळे-पाटील, तबरेज तांबोळी, डॉ.अनिल मुंढे, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता सांगळे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता गजानन मुळे, अभियंता आलम आदी उपस्थित होते.
Comments