लातूर: राज्यातले सरकार बदलल्यानंतर अच्छे दिन येतील अशी आशा दाखवत सगळ्यांची भलावण केली पण हाती काहीच पडलं नाही. शेतकर्यांची मोठी फसवणूक झाली. याचा जाब विचारण्यासाठी येत्या १४ मे रोजी राज्यभर शेतकर्यांचे जेलभरो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली. यासोबतच शहीद झालेल्या शेतकर्यांना टाऊन हॉल मैदानावरील स्मृतीस्तंभाजवळ आदरांजली अर्पण करण्यात आली.
निर्यातबंदी असल्यामुळे शेत मालाला भाव मिळत नाही. ही बंदी उठली असती तर शेतकर्यांना जगाची बाजारपेठ खुली झाली असती. विद्यमान सरकार भांडवलदार धार्जिणे असल्याने मुळातच धोरण शेतकरी विरोधी आहे असाही आओप पाटील यांनी केला. हुतात्मा जागर शेतकरी यात्रेच्या निमित्ताने ते लातुरात आले होते. शेतकर्यांची चोहोबाजुंनी कोंडी होत असल्यानेच आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या आत्महत्यांना राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी कालिदास आपेट, गणेश जगताप, किशोर ढमाले, संजय जगताप, राजकुमार सस्तापुरे उपस्थित होते.
Comments