लातूर: लातुरच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक नवी घटना समोर आली आहे. भाजपाचे निष्ठावान अप्पा रमेश कराड राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. आज रात्री किंवा उद्या सकाळी कराड यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश नक्की आहे, या प्रवेशानंतर त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी देणार आहे अशी माहिती खात्रीच्या सुत्रांनी दिली! या अनपेक्षित बदलामुळे लातुरच्या राजकारणाचा सगळा नूरच बदलणार आहे. कारण लातूर ग्रामीण मतदारसंघात त्यांच्याइतका तुल्यबळ उमेदवार भाजपाला मिळणे शक्य नाही. चालू असलेल्या चर्चांनुसार भिसेंना उमेदवारी मिळणार नाही. जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख ग्रामीण मतदारसंघात कॉंग्रेसकडून उभे राहू शकतात पण त्यांना माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांना टक्कर द्यावी लागणार आहे. मागच्या अनेक वर्षांपासून कव्हेकर ग्रामीण भागात रमले आहेत. अनेक ठिकाणी सभा, अडचणीच्या प्रसंगी धावून जाणे अशा कसरती ग्रामीण मतदारसंघ डोळ्यासमोर ठेऊन चालवल्या आहेत. हे खरे असले तरी त्यांना कोणता पक्ष जवळ करणार हा खरा प्रश्न आहे. कराडांच्या बॅक एंट्रीमुळे ओपन एंट्रीतले पहेलवान अडचणीत येऊ शकतात. आ. दिलीपरावांनी यापुढे निवडणूक लढवायची नाही असा निर्धार केल्याने सगळ्या बगळ्या, कावळ्यांना, गिधाडांना आणि डोमकावळ्यांना सत्ता जवळ दिसू लागली आहे. या एका निर्णयाचे शेकडो परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसतील, त्याचे परिणाम लातूर लोकसभेवरही होतील हे नक्की!
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस पप्पू कुलकर्णी यांनी या सगळ्या बाबतीत माहिती नसल्याचा सूर आळवला. नळदूर्गचे अशोक जगदाळे यांना पवार साहेबांनी दोन महिन्यांपूर्वीच ‘कामाला’ लागण्याचे आदेश दिले होते. त्यांनी आजवर या कामासाठी लाखोंचा खुर्दा केल्याचे बोलले जात आहे. नेत्यांने निर्णय घेतले असतील तर ते आजवर अमच्यापर्यंत पोचले नाहीत अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
Comments