लातूर: लातूर आणि पाणी पुरवठा या दोघांच्याही कुंडल्या मुख्यमंत्र्यांनी तपासून पहाव्यात (ते कुंडली तज्ञ आहेत म्हणून). या दहा वर्षाच्या काळात लातूर आणि पाणी पुरवठ्याचं कधी जमलंच नाही. कधी पाणी नसतं म्हणून बोंबाबोंब तर कधी पाणी असूनही बोंबाबोंब. कधी वीज कापली जाते, कधी पंप नादुरुस्त होतो, कधी तुरटी संपते तर कधी ब्लिचींगचा पत्ता नसतो. त्यात भरीस भर म्हणून कधी पाईपलायनी फुटतात तर कधी मेंटेनन्सच्या नावावर निर्जळी सोसावी लागते. हा क्रम मागे पुढे सातत्याने सुरुच असतो. लातुरकरांना पाण्यातच गुंतवून ठेवण्याचा डाव भाजप आणि कॉंग्रेसने रचला असावा अशी शंका अनेक राजकीय तज्ञ व्यक्त करतात.
काही दिवसांपूर्वी लातुरचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे ठप्प झाला होता. कारण काय असावे? तुरटी संपली होती. जुना गुत्तेदार पैसे अडल्याने पुरवायला तयार नव्हता. नव्यानं कुणी उधार द्यायला तयार नव्हतं! आता परवा पुन्हा असंच झालं. ब्लिचींग पावडर संपल्यानं पाणी शुद्धीकरण थांबलं. पर्यायानं पाणी पुरवठा लांबला. या युद्ध प्रसंगी मनपाची वाहने सोलापूर आणि उस्मानाबादला रवाना झाली त्यांनी काही प्रमाणात ब्लिचींग आणलं. थोडंफार शिल्लक असलेलं आणि या दोन गावाहून आलेलं बिलींग वापरुन कसंबसं पाणी शुद्ध करण्यात आलं. काल राजीव गांधी चौक, अशोक हॉटेल चौक आणि शासकीय कॉलनीतील टाक्या भरण्याचा प्रयत्न झाला. कसंबसं दोन तीन तास उशिराने पाणी पुरवठा करण्यात आला. आलेलं पाणी काय दिव्य होतं हे तर आम्ही सांगू नये अन तुम्ही विचारु नये!
लातूर मनपाचा ब्लिचींग पुरवठादार पैसे थकल्याने आणि टेंडर संपल्याने ब्लिचींग द्यायला तयार नाही. बाजारात मनपाला कुणी उधार द्यायची हिम्मत करीत नाही, क्लोरीनच्या पुरवठादाराचीही जवळपास अशीच अवस्था असल्याने तोही पुरवठा करण्याच्या मनस्थितीत नाही. भाजपा सत्तेत आल्यास मनपात निधीचा महापूर येईल अशी आश्वासनं दिली गेली. एवढी वर्षे अनुभवल्यानंतर नगरपालिकाच बरी होती. भाजपा आणि कॉंग्रेस दोघांचीही आश्वासने खरी नव्हती याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
Comments