HOME   टॉप स्टोरी

आघाडीची ताकद वाढली, अशोक जगदाळे आघाडीवर- धनंजय मुंडे

कराडांवर टाकला विश्वास, ऐनवेळी केला विश्वासघात, धसांनी किती केले तोडपाणी?


आघाडीची ताकद वाढली, अशोक जगदाळे आघाडीवर- धनंजय मुंडे

लातूर: लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची संख्या पाहता या निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधीमंडळातील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी येथे आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला़. लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या प्रचारार्थ येथील हॉटेल विटस् ग्रँड येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेस माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री आमदार दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जीवनराव गोरे, आमदार अ‍ॅड़ त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, लातूर लोकसभा युवक काँगे्रसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती़. लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे सलग तीन टर्म अतिशय सक्षमपणे आमदार दिलीपराव देशमुख यांनी नेतृत्व केले़ आता या मतदार संघातून अशोक जगदाळे निवडणुक लढवित आहेत़. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या़ रमेश कराड यांच्यावर विश्वास टाकला त्यांना उमेदवारी दिली ऐनवेळी त्यांनी विश्वासघात केला, असे नमूद करुन धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीकरीता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले तेव्हा शिवसेनेचाही उमेदवार जाहीर झाला होता़ उस्मानाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठींबा नाही, असे जाहीर केले होते़ या सर्व बाबी लक्षात घेता अशोक जगदाळे यांचा विजय निश्चित झाला आहे़ या मतदार संघाच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल, असेही ते म्हणाले़. एका प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये तोडपाणी करणारे नेते आहेत, हे सुरेश धस यांना दोन महिन्यांतच कसे कळले़ स्व़. गोपीनाथराव मुंडे यांचे पाईक असलेले रमेश कराड यांना भाजपाने डावलून सुरेश धस यांना कसे तिकीट दिले़ त्यासाठी सुरेश धस यांनी भाजपा नेत्यांसोबत किती तोडपाणी केले हे त्यांनीच सांगावे़. दुसर्‍या एका प्रश्नाबाबत ते म्हणाले की, रमेश कराड यांनी भाजपाकडून लातूर ग्रामीणमधून दोन वेळा निवडणूक लढवली़ आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे़ आघाडीत लातूर ग्रामीण मतदार संघ कॉंग्रेसकडे आहे़ तो काँग्रेसकडेच राहिल. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, बसवराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, एस़ आऱ देशमुख, आबासाहेब पाटील, प्रशांत पाटील, अ‍ॅड़ श्रीकांत सूर्यवंशी, राजा मनियार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते़.


Comments

Top