मुंबई: कर्नाटकात कुणालाही बहुमत मिळणार नाही हा अंदाज खरा ठरवित इथल्या मतदारांनी भाजपाला १०४, कॉंग्रेसला ७८ तर जेडीएसला ३८ जागा दिल्या. दोन अपक्ष उमेदवारांनाही संधी मिळाली. दरम्यान हुबळी-धारवाड मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरली आहे. या ठिकाणच्या मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. यामुळे भाजपाची एक जागा कमी झाली आहे. या मतदारसंघात पुनर्मोजणी होऊ शकते किंवा पुन्हा मतदान घेतले जाऊ शकते.
दरम्यान कॉंग्रेस आणि भाजपा या दोघांनीही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. येदीयुराप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करु शकतो असं ते म्हणतात तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांनीही असाच दावा केला आहे. कुमारस्वामी हे जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. कर्नाटकातील हा विय अभूतपूर्व आणि असामान्य आहे. भाजपा उत्तरभारतीयांचा पक्ष आहे, हिंदी भाषिक पक्ष आहे असं सातत्त्याने हिणवण्याचा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. पण अशा विकृतांना कर्नाटकच्या जनतेने चोख उत्तर दिले आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. कॉंग्रेस पक्ष कर्नाटकसाठी सतत लढत राहील असा विश्वास राहूल गांधी यांनी ट्वीटरवरुन दिला.
कॉंग्रेसचे सात आमदार भाजपाच्या संपर्कात असून त्यांना अज्ञातस्थळी पाठवण्यात आलं आहे अशीही चर्चा आहे. कर्नाटकातील नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्या खरे चित्र स्पष्ट होईल.
Comments