लातूर: सगळ्याच निवडणुकात जिंकण्याचा महत्वाकांक्षा घेऊन निघालेल्या भाजपाने आता कर्नाटक निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकांवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. आज लातुरच्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठवले. ही बातमी फुटली आहे हे कळताच त्यांनी ऐनवेळी तीनदा वेळा बदलल्या आणि स्थळही बदलले. अखेर राजा नारायण लाहोटी इंग्लीश स्कूलमध्ये हे सारे सापडले. पण आजलातूरच्या कॅमेर्यातून मात्र निसटू शकले नाहीत. यावेळी संतापलेले भाजपाचे कार्यकर्ते अप्पासाहेब मुंडे यांनी वृत्तांकन करणारे आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप यांना गचांडी पकडून शाळेबाहेर काढले तेव्हा इतर पत्रकार मदतीला धावले. ही शाळा आहे असं ते म्हणाले. त्यावर मग शाळेत इतक्या नगरसेवकांचं काय काम आहे? इतक्या गाड्या शाळेत संध्याकाळी का येतात? असा प्रश्न जगताप यांनी केला. त्यावर शैलेश लाहोटी यांनी सारवासारव करीत जबरीने चहा पाजला, चांगलाच टाईमपास केला. तोवर महिला नगरसेवक आणि मिस्टर नगरसेवकांची गाडी निघून गेली. त्यानंतर काही वेळाने पुरुष नगरसेवकांची गाडी बाहेर पडली!
ही शैक्षणिक सहल आहे. याचा खर्च मी स्वत: करतोय असा दावा शैलेश लाहोटी यांनी केला. नंतर खाजगी गप्पात पक्षाचा हा कार्यक्रम आहे पक्षाचाच खर्च आहे असे त्यांनी कबूल केले. वृत्तांकन करताना यशवंत भोसले, अप्पासाहेब मुंडे आणि इतर नगरसेवकांनी व्यत्यय आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. याबाबत निवडणूक आयोग, प्रेस कौन्सिल अक्रीडेशन कमिटी आणि मानवी हक्क आयोगाकडे चित्रीकरणासह तक्रार करणार असल्याचे रवींद्र जगताप यांनी सांगितले. चित्रिकरण सुरु असताना भाजपाचे प्रवक्ते शैलेश स्वामी यांनी तोंड लपवून घेतले, काही नगरसेवक शाळेच्या पाठीमागे गेले तर काहींनी ‘आलोच’ असे सांगत काढता पाय घेतला.
Comments