HOME   टॉप स्टोरी

पालकमंत्र्यांकडे शेतकर्‍यांकडून राजीनाम्याची मागणी

तूर, हरभरा फरकाची रक्कम पेरणीपूर्वी द्या- शेतकरी संघटना निलंगेकरांच्या घरी


लातूर: सरकारच्या तूर आणि हरभरा खरेदीत लातुरच्या शेतकर्‍य़ांचे मोठे नुकसान झाले. त्यांना या खरेदीतल्या फरकाची रक्कम शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी द्यावी. हे करणे शक्य नसेल तर पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी लातुरच्या शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात त्यांनी आज पालकमंत्र्यांची लातुरातल्या घरी भेट घेतली आणि निवेदन दिलं.
आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातुरात होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, महिला प्रदेशाध्यक्षा विमलताई आकनगिरे, तालुकाध्यक्ष मलबा चामे, अमोल पवार, शंकर वरवटे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शेतकर्‍यांची अडचण समजाऊन सांगितली आणि निवेदन दिले.
पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतात त्यांनी प्रत्येक घटकातील अडचणींचा विचार केला पाहिजे, लातूर जिल्हा तूर आणि हरभरा उत्पादनात देशात आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणावर या दोन पिकांचे उत्पादन होते. आपल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हमीभावाचा अधिकाधिक फायदा व्हायला हवा याची काळजी त्यांनी घ्यायला हवी पण असे होत नाही. लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे शंभर कोटीवर नुकसान झाले आहे. या सगळ्याचा विचार करुन पालकमंत्र्यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी या संघटनेने केली आहे.


Comments

Top