HOME   टॉप स्टोरी

रमेश कराड यांनी आघाडीतच रहावं, विनंती करणार

मतमोजणी अन निकालाची उत्कंठा, शेतकर्‍यांसाठी अल्प दरात भोजन, योजना निरंतर


लातूर: विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जरी लांबला असला तरी त्याची उत्कंठा आहेच. ०६ जूनला निकाल लागेल, मतमोजणी होईल. रमेश कराड आघाडीत आले, आमच्याशी संवाद साधला, आघाडीत आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागतच केलं पण नंतर काय बिघाडी झाली, त्यांनी का माघार घेतली हे कळत नाही, अजून तरी ते आघाडीतच आहेत, त्यांनी आघाडीतच रहावं अशी विनंती करु असे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. लातूर बाजार समितीने शेतकर्‍यांना पाच रुपयात पोटभर जेवण ही योजना सुरु केली त्यांचं उदघाटन आ. देशमुख यांनी केलं. त्यावेळी ते आजलातूरशी बोलत होते.
शेतकरी हा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा मुख्य घटक आहे. तो अडचणीत आहे. त्याची सोय व्हावी म्हणून बाजार समितीने हा उपक्रम सुरु केला. शेतकरी खूप दूरवरुन येतात, त्यांची मोठी हेळसांड होती. त्यांना किमान जेवण तरी परवडणार्‍या भावात आणि चांगलं मिळावं असा विचार बाजार समितीने केला ही चांगली बाब आहे म्हणून आम्ही पाठिंबा दिला. असेही ते म्हणाले. या भोजनगृहात शेतकर्‍यांसाठी तक्रार आणि सूचना पेटी ठेवावी असे सांगत या उपक्रमाबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी बाजार समितीचे आभार मानले. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती ललीतभाई शाहा होते. मंचावर आमदार त्रंबक भिसे, माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी आमदार, वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने नेहमीच शेतकर्‍यांना केंद्रबिंदु मानून काम केले आहे. बाजारात येणार्‍या शेतकर्‍यांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जनसेवेचा वसा पुढे चालवित कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांना अल्प दरात भोजन व्यवस्थेचा प्रारंभ केला आहे, हे कौतुकास्पद आहे. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती ललीतभाई शाहा यांनी केले. माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी आमदार वैजनाथ शिंदे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अशोक अग्रवाल व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांची भाषणॆ झाली. आभार प्रदर्शन उपसभापती मनोज पाटील यांनी केले.


Comments

Top