लातूर: आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लातुरच्या खोरी गल्लीतील दीपक ड्रायक्लिनर्स या लॉंड्रीला आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या या आगीत बघता बघता लाखो रुपयांचे कपडे भस्मसात झाले. याचवेळी पालकमंत्री संभाजी पाटील यांचा ताफा या रस्त्यावरुन जात होता. पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेत आग लागलेल्या दुकानात जाण्याचा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला कारण दुकानामागे आणि वर लॉंड्रीचालक नन्नवरे यांचं कुटुंब राहते. त्यांची काळजी त्यांना होती. पण आग लागलेल्या दुकानात पालकमंत्र्यांना जाण्यापासून कार्यकर्त्यांनी रोखले. पालकमंत्र्यांनी तातडीने सगळी यंत्रणा जागी करुन ही आग पसरत जाऊ नये याची काळजी घेतली. कुणाल वागज यांच्यासह अनेक स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशामक दलाच्या कार्यालयास संपर्क करण्यात आला. पाणी होते, गाडीही होती पण चालक नसल्यानं एमआयडीसीच्या अग्नीशामक दलाला शरण जावं लागलं. या प्रयत्नात बराच वेळ निघून गेला. दरम्यान लोकांनी कौतुकाने शिवलेले कपडे आणि पै पै जमवून महिलांनी घेतलेल्या साड्या तोपर्यंत शहीद झाल्या. महिलांच्या साडी विभागात तर काहीच उरले नव्हते. जे काही दोन चार टक्के कपडे जिवंत राहिले तेही धुरामुळे काळे पडले होते. तहसीलच्या मंडलाधिकार्यांनी घटनास्थळाला भेट दिली. तहसीलदारही बोलले, पंचनामा आणि बाकीची प्रशासकीय कार्यवाही सुरु होती. विजय नन्नवरे कुटुंबियांचं हे दुकान आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबातील सार्यांनाच धक्का बसला आहे. ही घटना जशी जशी कळत गेली तसतसे लोक जमणं अजून सुरुच आहे. या भागातील नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आग घरापर्यंत जाऊ नये आणि अन्यत्र पसरु नये याची काळजी घेतली.
Comments