HOME   टॉप स्टोरी

साठे चौकात सार्वजनिक शौचालय, काम पाडले बंद

काम थांबवण्याचे महापौरांचे आदेश, सांस्कृतिक भवनाचे काय झाले? पालकमंत्र्यांचाही निषेध


लातूर: अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील अतिक्रमण मुक्त केलेल्या भागात लातूर महानगरपालिकेच्यावतीने सार्वजनिक शौचालय बाधंण्यात येऊ नये या मागणीसाठी आज समस्त मातंग समाजाच्या वतीने महापौरांना निवेदन देण्यात आले. या जागेवर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या कामासाठी ५ कोटींचा निधीही मंजूर झाल्याची घोषणा यावेळी पालकमंत्र्यानी केली होती. पण या आश्वासनाची पुर्तता अद्याप झालेली नाही मात्र त्या जागी सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामास कालपासून सुरूवात करण्यात आली होती. यामुळे समाजाच्या लोकांच्या भावना दुखावल्या असे शिष्टमंडळाने सांगितले. सभागृहाच्या नियोजीत जागेत दुसरे काही करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने करू नये अशी मागणी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली. पालकमंत्र्यानी फसवी घोषणा करून समाजाची दिशाभूल केली अशा शब्दात समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. शौचालयाचे हे काम असेच
चालू राहिले तर होणार्‍या परिणामांना महानगरपालिका जबाबदार असेल असा इशारा सुनील सौदागर यांनी दिला. यावेळी मागण्यांचे निवेदन महापौरांना देण्यात आले. त्यावेळी महापौर सुरेश पवारांनी ते काम तात्काळ थांबवण्याचे आदेश संबधीत अधिकार्‍यांना दिले. मातंग समाजाचे प्रतिनीधींची समिती तयार करून सभागृहाबाबत आराखडा तयार करू असे आश्वासित केले. यावेळी सुनील सौदागर, राज क्षिरसागर, अशोक पाटील, सचिंद्र कांबळे, मोहन सुरवसे, सुरेश चव्हाण, संभाजी गव्हाणे, पिराजी साठे, छोटू मस्के, महादेव रसाळ उपस्थित होते.
गंजगोलाईतून शाहू चौकात जाताना डाव्या बाजुला अतिक्रमण काढल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर सुलभ शौचालयासाठी दोन मोठे खड्डे घेण्यात आले आहेत. अण्णाभाऊंच्या पुतळ्याजवळ सार्वजनिक शौचालय कशासाठी? मग सांस्कृतिक भवनाचे काय असा प्रश्न केला जात आहे.


Comments

Top