HOME   टॉप स्टोरी

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, सात जुनलाच मिळाली सलामी!

आज २८.४३ मिलीमीटर पावसाची नोंद, शुभ संकेतामुळे सगळ्यांच्या आशा पल्लवित


लातूर: भीषण दुष्काळाच्या झळा सोसलेल्या लातूर जिल्ह्याला सलग तिसर्‍या वर्षी चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. २०१६ साली दुष्काळ संपताना ११५ टक्के पाऊस झाला. १७ सालीही पावसाने उत्तम आभाळमाया दाखवली. यावर्षीही सरासरीच्या ९७ टक्के पाऊस होण्याचे भाकित वर्तवले गेले. आज नेमका मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर लातुरकर साखर झोपेत असताना पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी पाऊस सुरु झाला. हा पाऊस सात वाजेपर्यंत सतत बरसला. पुढे आठ वाजेपर्यंत त्याची रिपरिप सुरु होती. नंतर काही काळ सूर्यदर्शन झाले. पुन्हा ढगांनी आकाश व्यापून घेतले. आज दिवसभरात पुन्हा पाऊस होण्याची चिन्हे आहेत. आज २८.४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस जवळपास जिल्हाभर होता. एकूण अवस्था पाहता यंदा चांअगला पाऊस होईल असा अशी अपेक्षा निवासी उप जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी आजलातूरशी बोलताना व्यक्त केली. या पावसाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग दक्ष असून आवश्यक ते सरावही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आजचा पाऊस सबंध जिल्हाभर झाला. काही ठिकाणी तो कालच बरसून गेला. आज पहाटे चार वाजल्यापासून सगळीकडे तो बरसत होता. काही ठिकाणी पाच वाजता, काही ठिकाणी सहा वाजता, काही ठिकाणी सात वाजता त्यानं आगमन केलं. लातूर शहरावर सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी केलेली मेहेरबानी सात वाजेपर्यंत टिकून होती.


Comments

Top