लातूर: एक तरुण, ज्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही, त्याला पोलिस पकडतो, मारहाण करतो, पाया पडायला लावतो, धर्मावरुन शिवीगाळ करतो, हा तमाशा जवळपास तासभर चालतो, लोक बघत राहतात, मोबाईलवर चित्रीकरण करतात, ते पोलिसालाही कळते तरी कार्यक्रम चालूच राहतो!....ही घटना आहे लातुरच्या लोकमान्य टिळक चौकातली, भर दुपारी घडलेली. एरवी हा चौक सिग्नलविना आणि पोलिसांविना वाहत असतो तेव्हा मात्र खात्याला त्याचे सोयरसुतक नसते. ‘मागणी’ पूर्ण नाही झाली की सरकारी कामात अडथळा आणल्याचं कलम लावीन ही धमकी हत्यारासारखी वापरली जाते. असाच हा प्रकार.
शेख अब्दुल युनूस नावाचा तरुण मालकाची मोटारसायकल घेऊन घराकडे जेवायला जात असताना हेड कॉन्स्टेबल किरण माशाळे यांनी त्याला अडवलं, परवाना विचारला. तो नव्हता, दंड भरण्याची तयारी दाखवली पण तेही ऐकायला तयार नव्हते, गाडी ठेऊन घ्या घरी जाऊन पैसे घेऊन येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही दाद मिळाली नाही, आहे तेवढे पैसे देऊन टाक अन्यथा पुढे फार अवघड होईल असे सांगत गचांडी पकडून रिक्षात कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून पायाही पडून घेतले. जबरीने ठाण्यात आणून मारझोड केली, गुन्हाही नोंद केला असं यंग मुस्लीम योद्धा संघटनेने पोलिस उपाधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. युनूससोबत पोलिसाची झटापट चालू असताना अनेकांनी चित्रिकरण केलं. ती चित्रफीत सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. कारवाई करतो असं आश्वासन पोलिस उपाधिक्षक शिलवंत ढवळे यांनी दिल्याचं युनूस सांगतात. या प्रकरणी कारवाई न झाल्यास लातुरातील सर्व पक्ष संघटना एकत्र येऊन आंदोलन करु असा इशारा एमआयएम अली पक्षाचे अध्यक्ष अॅड. अली यांनी दिला.
Comments