लातूर: संभाजीराव पाटील हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे नसून ते पणवतीमंत्री आहेत असे अभय साळुंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये लातूर शहरास पाणी पुरवठा करणार्या मांजरा धरणात फक्त २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यामुळे येणार्या काळात पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लातूर शहरास उजनी धरणाचे पाणी द्यावे अशी मागणी अभिमन्यू पवारांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती मात्र त्या मागणीचा पाठ्पुरावा न करता पालकमंत्री गरज नसल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे पालकमंत्री हे जिल्ह्यास लागलेले ग्रहण असल्याचे साळुंके म्हणाले. आजपासून धनेगाव बॅरेजमधुन एमआयडीसीला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे १० हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. यामुळे काही दिवसात उजनी धरणातून मंगलकलश आणून ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि निळकंठेश्वराला अभिषेक करणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले ते पत्रपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्र्यानी संभाजीरावांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कुलदीप सुर्यवंशी, शंकर रांजणकर, विष्णू साबदे, दिनेश बोरा, सुरज झुंजे पाटील, विशाल माने उपस्थित होते.
Comments