लातूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल आक्रमक बनत आहे. अलिकडेच राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांचा मुद्दा मांडला होता. त्यानुसार आज लातुरातील कार्यकर्त्यांनी सनरिच आणि मेरिडियन दोन बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांना लक्ष्य केले. एमआयडीसीतील संबंधित कंपन्यांच्या कारखान्यात जाऊन या बाटल्यांवरचे लेबल मराठीत छापा असे सुनावले. या बाटल्या महाराष्ट्रातच विकतात. ग्राहकही मराठीच आहे, आपल्या उत्पादनाचे नाव इंग्रजीत असल्याने बाटली नेमकी कोणत्या ब्रॅंडची आहे हे कमी शिक्षित ग्राहकांना समजण्यास गफलत होते. असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आपण करीत असलेल्या कार्यवाहीबाबत १५ दिवसात लेखी स्वरुपात कळवावे अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील सर्वच बाटलीबंद पाणी तयार करणार्या कारखान्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. लातूरच्या या दोन कारखान्यातील प्रशासनाला आज निवेदन सुपूर्त करण्यात आले. यावर कार्यवाही न केल्यास खळ्ळ खट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच्या वतीने किरण चव्हाण यांनी दिला. यावेळी भागवत शिंदे, लालासाहेब मोहिते, रणवीर उमाटे, मनोज अभंगे, मुनवर सय्यद, लता गायकवाड, अजय कलशेट्टी, अमोल काळुंगे, बालाजी कांबळे, श्रावण बनसोडे, अक्षय चव्हाण उपस्थित होते.
Comments