HOME   व्हिडिओ न्यूज

उप विभागीय कार्यालयावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

खड्डे, शेतकरी, पाणी, महागाई, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, शिष्यवृत्ती, कुपोषण.....


लातूर: लातूर शहर राष्ट्रवादीने आज लातुरच्या उप विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. खास प्रकारचे डिजिटल अंगरखे घालून काढलेल्या या मोर्चाने सगळ्यांचे लक्ष वेधले. मोर्चातल्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी दंडवतही घातला. युतीचे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे असा आरोप करीत राज्याला आवश्यक असणार्‍या बाबींकडे लक्ष न देता बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गावर खर्च केला जात आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच असून सगळे रस्ते खड्डेमय बनले आहे, कर्जमाफीची नावावर शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे, लातुरला उजनीचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, आज मांजरा धरण भरलेले असतानाही लातुरला आठवड्यातून दोनवेळा पाणी मिळत नाही, अवैध धंदे बोकाळले आहेत, लातुरला विकासासाठी निधी मिळत नाही, कुपोषण आणि बालमृत्यू वाढले आहेत, आरक्षणाची मागणी तशीच पडून आहे, शिष्यवृत्ती धोरणांमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, उद्योग आणि रोजगारही रसातळाला जात आहेत, शेतकर्‍यांना पुरेशी वीज मिळत नाही, अमृतचे काम नीटपणे केले जात नाही, वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे असे अनंत प्रश्न उपस्थित करीत या सगळ्यांवर उपाय योजना करावी अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली. येत्या एक तारखेला यवतमाळ ते नागपूर अशी पायी दिंडी निघणार असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार १२ तारखेला वाढदिवस साजरा न करता या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत अशी माहिती मकरंद सावे यांनी दिली.
राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात प्रशांत पाटील, पप्पू कुलकर्णी, बबन भोसले, मुफ्ती फैयाज अली, सय्यद इब्राहीम, प्रवीण नाबदे, रेखा कदम, राजा मनियार, विजय टाकेकर, जितेंद्र गायकवाड, डॉ. विभाकर मोरे, सय्यद जाकीर, विशाल विहिरे, अलीम काझी, इरण्णा पावले, एहरार हक्कानी, अजिम काझी, टिल्लू शेख, मुन्ना तळेकर, अजहर मनियार, विकास लांडगे, रेखा घोगरे, अरविंद कांबळे, संतोष भोसले, आरके चव्हाण, ताज शेख, फारुक तांबोळी, खुद्दुस पटेल, पूजा गोरे, महेश म्हेत्रे, कालिंदी सूर्यवंशी, सरिता पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Comments

Top