लातूर: सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी पण अजून याद्यांचाच घोळ सुरु आहे. ही घोषणा सरकारने कसलाही अभ्यास न करता केली. शेतकरी कर्जमाफी कधी होते याची अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा करीत आहे, मुळात सरकारला कर्जमाफी करायचीच नाही असा दावा आ. अमित देशमुख यांनी केला. आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आ. देशमुख यांनी पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर ते आजलातुरशी बोलत होते.
सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा राजकीय होती, विरोधी पक्षाच्या दबावामुळे सरकारला ही घोषणा करावी लागली. कर्जमाफी करणार असं म्हणतात पण त्यासाठी लागणारा पैसा सरकारच्या तिजोरीत आहे की नाही याबद्दल शंकाच आहे. सगळाच गोंधळ आहे, गोंधळाची स्थिती आहे. या गोंधळामुळं महाराष्ट्र होरपळत आहे. असेही ते म्हणाले. या आधी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली होती. असा काही दबाव विरोधक आणणार का? असा प्रश्न केला असता, दबाव आजही सातत्याने आहे. शेतकर्यांच्या याद्या मागवणं, त्या परत पाठवणं, पुन्हा मागवणं पुन्हा सर्वेक्षण करणं असा प्रकार यापूर्वी असा प्रकार कुठल्याही सरकारनं केला नाही. कॉंग्रेसनं ७० हजार कोटींची कर्जमाफी केली, त्याची अमलबजावणी केली, तेव्हा एकही तक्रार आली नव्हती. राज्य सरकारला कारभार चालवणं जमतं की नाही हा प्रश्न आहे. याद्यांचा घोळ पुन्हा सुरु राहणार आहे. जनतेच्या आशिर्वादानं कॉंग्रेसचं सरकार पुन्हा सत्तेत येईल, हेच सरकार तेव्हाच शेतकर्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लागेल असाही दावा आ. अमित देशमुख यांनी केला. यावेळी बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट, विक्रम हिप्परकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, संतोष देशमुख, मोईज शेख, दगडू मिटकरी, संभाजी सूळ, समद पटेल, विक्रांत गोजमगुंडे, कुणाल वागज यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments