HOME   व्हिडिओ न्यूज

पाशा पटेलांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, मनसेचा इशारा

टाळ मृदंगाच्या नादात काढली दिंडी, पटेलांच्या चिरंजीवांनी स्विकारलं निवेदन


लातूर: कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यातील झोपलेला शेतकरी नेता जागा करायचा आहे असं सांगत आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाऊन हॉल मैदान ते विवेकानंद चौक अशी दिंडी काढली. शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलते न झाल्यास किंवा उपाययोजना न केल्यास लातूर जिल्ह्यात फिरु दिले जाणार नाही असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना मुळात पाशा पटेल यांच्या घरावरच धडकायचे होते पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांना विवेकानंद चौकात थांबावे लागले. या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी असंतोष प्रकट केला. पाशा पटेल यांचे चिरंजीव परवेज पटेल यांनी मनसेचे निवेदन स्विकारले.
विरोधी पक्षात असताना शेतकर्‍यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवणारे ऊस, कापूस, गहू, ज्वारी, सोयाबीन, मूग आदी शेतीमालास स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल माफी करावी अशा प्रश्नांवर दिंड्या काढून पटेल यांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले होते. तेच शेतकरी नेते पाशा पटेल आज कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. फसवी कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव नाही, खरेदी केंद्रांवर जाचक अटी घातल्या जातात, वीज बिले सक्तीने वसूल केली जातात असे असतानाही पाशा पटेल मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे त्यांच्यातला झोपी गेलेला शेतकरी नेता जागा करायचा आहे असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. सरसकट कर्जमाफी द्यावी, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, हमी भाव द्यावा अन्यथा सरकारने फरकाची रक्कम द्यावी, खरेदी केंद्रावरील जाचक अटी रद्द कराव्यात, सोयाबीनचे अनुदान द्यावे, नरेगामधून शेतकर्‍यांच्या विहीरी, शेतरस्ते यांची कामे करावीत आणि १०० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन द्यावे अशा मागण्या मनसेनं केल्या आहेत. या दिंडीमुळे पाशा पटेल यांनी मुंबईकडे पळ काढला असा दावा तावरे यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधव, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाणे, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, भागवत शिंदे, संजय राठोड, भास्कर औताडे, शिवकुमार नागराळे, राजीव मोहगावकर, डॉ. अतुल धावारे, रवी सूर्यवंशी, मुकेश जाधव, नितीन ढमाले, सोमनाथ कलशेट्टी, संग्राम रोडगे, अजय कलशेट्टी, अजित घंटेवाड, संकेत बनकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top