लातूर: एड्स रुग्णांसाठी समर्पित असणारे देशातील पहिले हॉस्पीटल म्हणून ओळखले जाणारे उगीले हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने जागतिक एड्स सप्ताहानिमीत्य विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मोफत एड्सची रक्त तपासणी आणि समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. वंदना प्रदिप उगीले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोबाईलचे स्टेट्स अपडेट ठेवण्याच्या काळात खरी गरज आहे ती आपल्या एड्स तपासणीचे स्टेट्स अपडेट ठेवण्याची असेही त्यांनी सांगितले. जागतिक एड्स सप्ताह १ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत राबवण्यात येतो. देशातील एड्सबाधीत रुग्णांसाठीचे असणारे पहिले हॉस्पीटल म्हणून लातूरातील उगीले हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरची ओळख आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हॉस्पीटलच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. १ डिसेंबर रोजी एड्सची मोफत रक्त तपासणी शिबीराचे उदघाटन करण्यात येणार आहे. हे शिबीर ७ तारखेपर्यंत चालू राहणार आहे. २ डिसेंबर रोजी आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याची मोफत एड्सची रक्त तपासणी करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयीन गटात आणि खुल्या गटासाठी एक निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे. ७ डिसेंबर पर्यंत उगीले हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटर राजीव गांधी चौक लातूर येथे निबंध पाठवायचे आहेत. प्रथम पारितोषिक २००० रुपये, द्वीतीय पारितोषिक १५०० रुपये, तृतीय पारितोषिक १००० रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयीन गटासाठी एड्स मुक्त राष्ट्राची गरज, एड्स वास्तव, सत्य आणि कारणे, एड्स काल्पनिक विश्वाचे अंतिम सत्य, एचआयव्ही-एड्स रुग्णांचे मनोगत हे विषय आहेत तर खुल्या गटासाठी आधुनिक भारतासाठी एड्समुक्त समाजाची आवश्यकता, एड्स रुग्णांच्या पालकाचे मनोगत हे विषय ठेवण्यात आलेले आहेत.
Comments