भाजपचं सरकार हुकूमशाही पद्धतीनं चाललं आहे. नोटाबंदी करताना कुणालाही विश्वासात घेतलं गेलं नाही, यामुळं या देशाचं झालेलं नुकसान भरुन न निघणारं नुकसान आहे असे प्रतिपादन आ. अमित देशमुख यांनी केले. कॉंग्रेस भवनपासून निघालेल्या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने ते गंजगोलाई येथील भाषणावेळी ते बोलत होते. आज नोटाबंदीला वर्ष पूर्ण झालं. तिकडे पंतप्रधानांनी देशाचे आभार मानले. इकडे लातुरसह देशभरात नोटाबंदीचा निषेध झाला. लातुरच्या शिवाजी चौकात राष्ट्रवादीनं सरकारचं श्राद्ध घातलं तर दुसरीकडे कॉंग्रेसने जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध म्हणून हाताला काळ्या पट्ट्याही बांधल्या होत्या.
मोर्चा गोलाईत आल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. मोईज शेख यांनी प्रस्तावना केली. आपल्या भाषणात आ. देशमुख यांनी सरकार आणि नोटाबंदीचा जोरदार समाचार घेतला. नोटाबंदेमुळे धशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार संपेल, काळा पैसा बाहेर येईल असं सांगण्यात आलं पण तसं काही झालं नाही. नोटाबंदीमुळं दिडशेवर मृत्यू झाले, त्याला कोण जबाबदार आहे? मरण पावलेल्यांमध्ये कुणाचे वडील, कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाचा मुलगा होता. याचा जाब कुणाला विचारावा असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांना अजूनही पडलेलाच आहे. नोटाबंदीमुळं भारताची जगात नाचक्की झाली. पंतप्रधानांच्या मनात आलं आणि त्यांनी नोटाबंदी करुन टाकली. सर्वसामान्यांचा कष्टाचा पैसा एका क्षणात रंगीत कागदाचा तुकडा झाला. कुणाला डॉक्टरांची तर कुणाला शाळेची फी द्यायची होती, अनेकांना परदेशी जाता आले नाही, एवढं करुनही खोट्या नोटांचा प्रश्न तसाच राहिला. दोन हजारांच्या नकली नोटा सिमेपार लगेच तयार झाल्या. भाजपा नेत्यांच्या गाड्यातून अनेकदा पैसे सापडले पण त्याची अद्याप चौकशी झाली नाही, नोटाबंदीचं कसलंही अपेक्षित फलित मिळालं नाही. डिजिटल इंडियाचे नाव पुढे करीत खाजगी कंपन्यांना ट्रांजॅक्शन शुल्काच्या नावाखाली फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न झाला. ऑनलाईनचा आग्रह केला गेला. पण नेटवर्क मिळत नाही. कसे व्यवहार करायचे? नोटाबंदी चांगली आहे हे भाजपाला सांगावं लागतं. यामुळं झालेलं देशाचं नुकसान कधीच भरुन न निघणारं आहे असाही आरोप आ. देशमुख यांनी केलं.
यावेळी मोईज शेख, मनपाचे स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, महेश काळे, मनपातील विरोधी पक्षनेते विक्रांत गोजमगुंडे, बीव्ही मोतीपवळे, दगडू पडीले, संभाजी सूळ, व्यंकटेश पुरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments