लातूर: लातूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण करुन सामान्य जनतेला त्रास देणार असाल तर कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त अच्युत हंगे यांनी दिला असून विना परवाना रस्त्यावर व्यवसय करणार्यांचे साहित्य जप्त केले जाईल ते परतही केले जाणार नाही असे त्यांनी बजावले आहे. काल लातूर शहरातील बार्शी मार्ग आणि औसा मार्गावरील हातगाडे मनपा कर्मचार्यांनी उलथवून टाकले होते. यामुळे या व्यावसायिकांनी आयुक्तांची भेट घेऊन गार्हाणे मांडले त्यानंतर आयुक्त आजलातूरशी बोलत होते. लातूर शहरातील औसा, नांदेड, बार्शी आणि नांदेड या प्रमुख मार्गांच्या दोन्ही बाजुला अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत, अनेक पानपट्ट्य़ा, हातगाड्या दिसतात. त्यांना अनेकदा बजावूनही ते दाद देत नाहीत. यामुळे नागरिकांची अडचण होते, रहदारीत व्यत्यय येतो. त्यामुळेच गाडे हटवले गेले, त्यात नुकसान झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पूर्व परवानगी नसताना अशा प्रकारे अतिक्रमण करणे गैर आहे. ज्यांनी परवानगी घेतली त्यांना नोटिसा देऊ, पण ज्यांनी परवानगी घेतली नाही त्यांना नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये लातुरात सर्वेक्षण झाले होते. पण आता नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार फेरीवाल्यांना जागा देऊ. त्याआधी कुठेही अनधिकृतपणे गाड्यांवर व्यवसाय केल्यास ते ओढून नेऊ परतही दिली जाणार नाहीत असे आयुक्त हंगे म्हणाले.
Comments