HOME   व्हिडिओ न्यूज

अमृत योजनेसाठी खोदलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करा

दिशाच्या बैठकीत खा. सुनील गायकवाड यांच्या सक्त सूचना


लातूर: लातूर शहराला सुरळित व पाण्याचा अपव्यय न होता पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्याची कामे मोठया प्रमाणावर सुरु आहेत. परंतु संबंधित गुत्तेदार पाईपलाईनसाठी रस्ते खेदल्यानंतर रस्त्यांची तात्पुरती डागडुगी करत आहे. खोदलेले रस्ते व तात्पुरती डागडुगीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.तरी संबंधीत गुत्तेदारांकडून रस्ते खोदल्यानंतर ते चांगल्याप्रकारे महापालिकेने दुरुस्त करुन घ्यावेत, असे निर्देश खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी केले. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित जिल्हा विकास,समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीत खासदार गायकवाड बोलत होते. यावेळी महापौर सुरेश पवार, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शंकर बुरडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए.जी.एम. अभिजीत पांगरेकर,निलंगा पंचायत समिती सभापती अजित माने व इतर पदाधिकारी यांच्यासह सर्व संबंधीत यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. खासदार डॉ. गायकवाड म्हणाले की, अमृत योजनेचे काम समाधानकारक नाही. महापालिकेने संबंधीत गुत्तेदारांवर करवाई करावी. तसेच शहरात पाईपलाईनमुळे उखडण्यात आलेले सर्व रस्ते दुरुस्त करुन घ्यावेत, तसेच महापालिकेने पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाय योजना करुन या टंचाई परिस्थितीमध्ये पाण्याचा एक ही थेंब वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक बेघर नागरिकाला घरकुलाचा लाभ मिळाला पाहीजे हा केंद्रशासनाचा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. लातूर जिल्हयात प्रधानमंत्री आवास योजनाचे उदिष्ट ०३ हजार ४६४ इतके असून ०५ हजार ९३९ घरकुलांना मंजूरी मिळाली असून आज अखेरपर्यंत ०४ हजार ४९७ घरकुलांची कामे पूर्ण झालेली आहेत, ही बाब समाधानकारक असल्याचे मत डॉ. गायकवाड यांनी व्यक्त करुन जिल्हयाच्या ग्रामीण व शहरी भागातील एक ही पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ही त्यांनी सांगितले.


Comments

Top