रेणापूर: तालुक्यातील सामाजिक युवक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून रेणापूर येथे लोकसहभागातून युवकांसाठी जागतिक युवक दिन तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जंयती निमित्ताने कै. दगडोजीराव देशमुख आश्रमिय कनिष्ठ महाविद्यालय रेणापूर येथे लोकसहभागातून ग्रंथालय उभारण्यात आले. २००० पुस्तकाच्या ग्रंथालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते झाले. वाचून झालेली पुस्तके वाचनालयास द्यावीत असा हा उपक्रम आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिठाराम राठोड, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख गटशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे अँड. विवेकानंद उझळमकर, शिवशाहीर संतोष साळुंके, स्वातंत्र्य सैनिक मुरगाप्पा खुमसे, माजी सभापती प्रदीप राठोड, मुख्याध्यापक उत्तम राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ विपीन ईटनकर यांनी बोलताना म्हणाले की ग्रामिण भागात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे आणि आज या ठिकाणी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या ग्रंथालयाचा फायदा रेणापूर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा. तसेच आपल्या अभ्यासाची जिद्द आणि चिकाटीच्या बळावर या रेणापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी येणार्या काळात मोठे अधिकारी झाले पाहिजेत.
विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे वावरले पाहिजे, आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत मी सुद्धा मला आवडेल ते करतो परंतु हे सर्व करत असताना आपला अभ्यास त्यातून शिक्षण आणि ज्ञान मिळवले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त वाचनाची आवड निर्माण करावी. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच इतर सामाजिक ज्ञान मिळवावे असेही ईटनकर म्हणाले. या उपक्रमाला प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारची मदत व सहकार्य करण्यात येईल. असे उपक्रम व चळवळ जिल्हा व तालुकास्तरावर मर्यादीत न ठेवता राज्यपातळीवर राबवली पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक गोरख दिवे, डॉ नारायण देशमुख, शिवशाहीर संतोष साळुंके, मिठाराम राठोड, अॅड. विवेकानंद ऊजळमकर, जुनेद आतार, योगेश शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या अभियानाला शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी ग्रंथालयास धावती भेट देऊन अभियानाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर बडे, जुनेद आतार, ऋषिकेश फटाले, खंडू शिंदे, किरण बस्तापुरे, मयुरेश उपाडे, योगेश शेळके, रोहित बडे, महेश बडे यांच्यासह आदी युवकांनी परिश्रम घेतले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बळे यांनी तर सुत्रसंचलन किरण मस्तापुरे यांनी केले. आभार ऋषिकेश फटाले यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments