लातूर: थोर समाजसेवक अण्णा हजारे लोकायुक्त आणि लोकपालांच्या नियुक्तीसाठी तसेच शेतकर्यांच्या प्रश्नी राळेगण सिद्धी येथे उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला लातुरातही पाठिंबा मिळाला असून लातुरात गांधी चौकात कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
१९६६ मध्ये भारतीय प्रशासनिक आयोगाची स्थापना करण्य़ात आली होती. या आयोगाने स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनासाठी केंद्रीय स्तरावर लोकपाल आणि राज्य स्तरावर लोकायुक्त नेमण्याची शिफारस केली होती. त्यानंतर ०८ वेळा लोकपाल विधेयक संसदेत मांडले गेले पण सत्ताधारी आणि राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे ते मंजूर होऊ शकले नाही. २०११ च्या आंदोलनामुळे सरकारला २०१३ मध्ये कायदा करावा लागला आणि देशाला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा मिळाला. त्यानंतर जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्ताबदल केला पण कायदा पूर्णपणे अमलात आला नाही. यासाठी अण्णा हजारे उपोषण करीत आहे. या चळवळीला मानणार्यांनी आपापल्या गावी प्रबोधन करावे, अण्णाच्या गावी जाऊन तेथे गर्दी करु नये असे आवाहन हनीफभाई शेख यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात महेंद्र पतंगे, शेख इस्माईल, किशोर शिंदे, बासिदखान पठाण, इनूस चौधरी, अशोक देशमाने, नामदेव कारभारी, अनंत पारसेवार, अजीज मोमीन, महादेव बंडे, सुधीर पुरी, संजय डोंगरे, श्रीधर शिंदेबाबू शेख, माधव गुडे यांची नावे आहेत.
Comments